Abhishek Ghosalkar Murder Case: मॉरिस नोरोन्हा विरुद्ध एका महिलेने बलात्कार, ब्लॅकमेल आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आणि काही महिने तो तुरुंगात होता, अशी बातमी प्रसारमाध्यमांत झळकत आहे. परंतु, मॉरिसच्या कुटुंबाने त्याच्यावर लावण्यात आलेले बलात्काराचे आरोप खोटे असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, दिवंगत अभिषेक घोसाळकर यांची पत्नी आणि माजी नगरसेविका तेजस्वी यांनी मॉरीसवर फेसबुक लाईव्ह आक्षेपार्ह शब्द वापरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
अभिषेक घोसाळकर यांनी अमेरिकन अधिकाऱ्यांना पत्र लिहून मॉरिसला अमेरिकेत काम करण्यापासून रोखले. ज्यामुळे मॉरिसच्या व्यवसायावर परिणाम झाला, असे मॉरिसच्या कुटुंबाने सांगितले. मॉरिसची पत्नी सरिना एका खाजगी कंपनीत नोकरी करते. ज्यावेळी गोळीबार झाला, तेव्हा ती कामावर होती. सरिनाने सांगितले की, "माझ्या ओळखीच्या व्यक्तीकडून मला आलेल्या पहिल्या फोनमध्ये मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांना गोळी झाडल्याची माहिती दिली. हे राजकीय वैमनस्यातून घडले आहे असे मला वाटले. परंतु, दुसऱ्यांदा आलेल्या फोनमध्ये मॉरिसने स्वत:वर गोळी झाडल्याची माहिती दिली. त्यानंतर मी घरात एकटी असलेल्या मुलीकडे धाव घेतली."
सरिना पुढे म्हणाली की, "मॉरिसने पिस्तूल कुठून आणली? याबाबत मला काहीच माहिती नाही किंवा घोसाळकर यांच्याशी झालेल्या वैराबद्दल त्यांनी गुरुवारी घरी कोणाशीही चर्चा केली नाही. कोरोना महामारीच्या काळात मानवतावादी कार्यासाठी मॉरिसला पुरस्कार मिळाला. या संकटाच्या काळात मॉरिसने अनेक लोकांची मदत केली. नागरी निवडणुका लढवण्यास आणि समुदाय आणि रहिवाशांसाठी चांगले काम करण्यास तो खूप उत्सुक होता." गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मॉरीसने घोसाळकर यांच्याकडे मैत्रीचा हात पुढे केला होता, अशीही माहिती सरिनाने दिली.