Abhishek Ghosalkar Case : शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात आज मोठी अपडेट समोर आली आहे. अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्विनी घोसाळकर यांनी केलेल्या याचिकेची दखल घेऊन हायकोर्टाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग केला आहे. तेजस्विनी घोसाळकर यांच्या याचिकेवर सुनावणी घेताना उच्च न्यायालयाने (mumbai high court) मुंबई पोलिसांना चांगलेच झापलं. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठात यावर सुनावणीत झाली.
मुंबई पोलिसांनी तपासात केलेल्या त्रुटी या दखलपात्र असल्याचे म्हणत कोर्टाने घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयने करण्याचे निर्देश दिले आहेत. अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा तपास मुंबई पोलिसांनी गुन्हे शाखेकडे वर्ग केला होता.मात्र पोलिसांवर राजकीय दबाव असून तपास योग्य पद्धतीने होत नसल्याचा आरोप करत घोसाळकर कुटुंबियांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर कोर्टाने निर्णय देत आता हे प्रकरण सीबीआयकडे सोपवलं आहे.
तेजस्वी घोसाळकर यांनी हत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून काढून घ्यावा अशी मागणी करत आपल्या याचिकेत अनेक गंभीर दावे केलेहोते. अभिषेक यांच्या हत्येचा कट रचणारे खरे सूत्रधार अजूनही मोकाट आहेत. अभिषेक यांच्या हत्येच्या कटातील मुख्य आरोपी वसूत्रधारांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने पोलिसांनी गांभीर्याने तपास केला नाही. त्यामुळे सूत्रधार मोकाट आहेत. पोलिसांनी घाईघाईत आरोपपत्र दाखल केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
काही महिन्यांपूर्वी माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची मॉरिस नोरान्हा याने गोळीबार करुन हत्या केली होती. दोघांमध्ये वाद होते व आपल्याला जुने वाद मिटवायचे आहेत, असे सांगून मॉरिस याने अभिषेत घोसाळकर यांना आपल्या ऑफिसमध्ये बोलावले होते. दोघांनी जुने वाद मिटवत असल्याचे म्हणत फेसबुक लाईव्ह केले होते. मात्र फेसबुक लाईव्ह सुरु असतानाच मॉरिस नोरान्हाने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबार घोसाळकर यांचा मृत्यू झाला. त्यानंतर बाहेर येऊन मॉरिस नोरान्हा याने स्वतःवरही गोळ्या झाडत आत्महत्या केली. या घटनेने मुंबईत खळबळ माजली होती.