मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Aarey metro carshed: एकनाथ शिंदेंनी बदलला ठाकरे सरकारचा निर्णय; मेट्रो कारशेड आरेतच होणार

Aarey metro carshed: एकनाथ शिंदेंनी बदलला ठाकरे सरकारचा निर्णय; मेट्रो कारशेड आरेतच होणार

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jul 01, 2022 10:19 AM IST

एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेले निर्णय बदलण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी सूत्रे स्वीकारताच मेट्रो कारशेड संदर्भात महत्वाचा निर्णय घेतला आहे.

aarey metro car shed
aarey metro car shed (AP)

Mumbai Metro News  एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे स्वीकारताच ठाकरे सरकारच्या महत्वपूर्ण निर्णयांवर प्रहार करण्यास सुरुवात केली आहे. बहुचर्चित कुलाबा- वांद्रे-सिप्झ मेट्रो-३चे कारशेड आरे वसाहतीमध्येच करण्याचा निर्णय घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. त्यांचा हा निर्णय उद्धव ठाकरे यांना पहिला धक्का समजला जात आहे. या बाबत सरकारची भूमिका न्यायालयात मांडण्याचे आदेश राज्याच्या महाधिवक्त्यांना दिले गेले आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना भाजप युतीच्या सरकारमध्ये मेट्रो-३चे कारशेड आरेमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, यासाठी आरे परीसारतील झाडी तोंडली जाणार होती. या कारशेडचे २५ टक्के कामही पूर्ण झाले होते. मात्र, पर्यावरण प्रेमी आणि सामाजिक संघटनांनी याला विरोध केला होता. या कारशेड विरोधात मोठे आंदोलनही उभारण्यात आले होते. महाविकास आघाडीचे सरकार जेव्हा आले तेव्हा नागरिकांच्या भावना समजून हा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बदलला होता. या कारशेडमुळे पर्यावरणाचे नुकसान होणार असल्याचे सांगत या कामाला स्थगिती देण्यात आली होती. हे कारशेड आरेऐवजी कांजूरमार्ग येथे करण्याचा निर्णय ठाकरे यांनी दिला होता. मात्र, या जागेच्या मालकीवरून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील वाद उच्च न्यायालयात गेला आहे.

यामुळे हा प्रकल्प गेल्या अडीच वर्षांपासून रखडला आहे. राज्यात सत्तांतर होताच शिंदे आणि फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत मेट्रो-३ चे कारशेड आरेमध्येच करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पुढील सुनावणीच्या वेळी न्यायालयात भूमिका मांडण्याची सूचना फडणवीस यांनी महाधिवक्त्यांना दिली. त्यामुळे मेट्रो कारशेडचा गुंता सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्या शनिवारी आणि रविवारी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. यात नव्या सरकारला बहुमत सिद्ध करायचे आहे. अधिवेशनात पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक तर दुसऱ्या दिवशी सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग