मुंबईतील वैदर्भीयांनी कोकणी माणसाचा आदर्श घेऊन विदर्भाशी कनेक्ट ठेवावा: उद्योजक सुरेश हावरे
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुंबईतील वैदर्भीयांनी कोकणी माणसाचा आदर्श घेऊन विदर्भाशी कनेक्ट ठेवावा: उद्योजक सुरेश हावरे

मुंबईतील वैदर्भीयांनी कोकणी माणसाचा आदर्श घेऊन विदर्भाशी कनेक्ट ठेवावा: उद्योजक सुरेश हावरे

Updated Feb 05, 2025 08:51 PM IST

‘आपला विदर्भ’ या संस्थेद्वारे आयोजित मुंबईस्थित वैदर्भीय नागरिकांचे स्नेहसंमेलन नुकतेच नवी मुंबईतील खारघर येथे पार पडले. या कार्यक्रमासाठी मुंबई, नवी मुंबई, ठाणे भागात राहणारे वैदर्भीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुंबईस्थित वैदर्भीय नागरिकांचे स्नेहसंमेलन संपन्न
मुंबईस्थित वैदर्भीय नागरिकांचे स्नेहसंमेलन संपन्न

विदर्भाच्या विविध जिल्ह्यातून येऊन मुंबई राहत असलेल्या वैदर्भीय नागरिकांनी कोकणी माणसाचा आदर्श ठेवत विदर्भाच्या संपर्कात राहून विदर्भाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायीक व भाभा अणुसंशोधन केंद्राचे माजी अणुशास्त्रज्ञ डॉ. सुरेश हावरे यांनी केले. ‘आपला विदर्भ’ या सामाजिक, सांस्कृतिक संस्थेच्या तिसऱ्या स्नेहसंमेलनात ते बोलत होते. नवी मुंबईतील खारघर येथील एमटीडीसी रेसिडेन्सीमध्ये पार पडलेल्या स्नेहसंमेलनात ज्येष्ठ सनदी अधिकारी चंद्रकांत डांगे, ‘आपला विदर्भ’चे अध्यक्ष ॲड. विजयकुमार कोहाड, सरचिटणीस प्रमोद चुंचूवार आणि कोषाध्यक्ष अनंत शिंदे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी मुंबई, नवी मुंबई तसेच ठाणे परिसरातून आलेले वैदर्भीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोकणातील लोकांचा आदर्श घ्याः डॉ. हावरे

मूळ अमरावती जिल्ह्यातील पथ्रोट येथील रहिवासी असलेले, मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायीक डॉ. सुरेश हावरे या स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. डॉ. हावरे म्हणाले, ‘मुंबईत राहणाऱ्या कोकणी माणसांची प्रत्येक गावची एक संघटना वा मंडळ असते. मुंबईत राहूनही ते गावच्या विकासात योगदान देत असतात. या गावच्या मंडळांनी चाळीत वा सोसायट्यांमध्ये गावाच्या मालकीची एक खोली घेतलेली असते. या खोलीत गावाकडून नोकरीसाठी येणाऱ्या तरूणाची काही महिने राहण्याची सोय केली जाते. पूर्वी कोकणी माणूस मनीऑर्डरने आणि आता ‘जी-पे’ने गावी असलेल्यांना नियमीत पैसे पाठवतो. मात्र या उलट विदर्भाचा माणूस मुंबईत आला की त्याचा विदर्भाशी फारसा कनेक्ट राहत नाही. तो आधीही मनीऑर्डरने पैसे पाठवत नव्हता आणि आताही जी-पेने पैसे पाठवत नाही. हे चित्र बदलायला हवे. आपण विदर्भाच्या विकासासाठी मुंबईत राहून योगदान द्यायला हवे’ असं डॉ. हावरे म्हणाले. ‘आपला विदर्भ’ संस्थेने मुंबईस्थित वैदर्भीयांना एकत्रित जोडण्यासाठी एखादा ॲप विकसित करून त्यावर सदस्य नोंदणी, नोकरीची माहिती, विवाहासाठी स्थळ शोधणे या सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात, अशी सूचना त्यांनी केली. 

विदर्भापासून दूर हक्काचे कुटुंब- डांगे

मूळचे गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी असलेले असलेले, सध्या राज्याच्या वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत डांगे हे कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ‘आपला विदर्भ’ ही संस्था विदर्भापासून दूर राहणाऱ्यांना कुटुंबापासून दूर राहूनही हक्काचे कुटुंब म्हणून कार्य करीत आहे. ही चांगली संकल्पना असून मुंबईत राहणाऱ्या अधिकाधिक वैदर्भीयांपर्यंत पोहोचायला हवी. विदर्भातील झाडीपट्टी रंगभूमीला मुंबईत मानाचे स्थान मिळवून देण्यासाठीही संस्थेने काम करावे' असं डांगे म्हणाले.

मुंबईत विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान वैदर्भीय नागरिकांचा तसेच शालेय जीवनात विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात ‘चंद्रपूरच्या महाकालीची लोकपरंपराः माय धुरपता’ या पुस्तकाचे लेखक, ज्येष्ठ पत्रकार संजीव भागवत यांचाही सत्कार करण्यात आला. 

 

Haaris Rahim Shaikh

TwittereMail

हारीस शेख हे हिंदुस्तान टाइम्स -मराठीचे संपादक आहेत. यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र टाइम्स (ऑनलाइन)चे संपादक म्हणून काम केले आहे. तत्पूर्वी मटा (ऑनलाइन)चे दिल्ली प्रतिनिधी, ईटीव्ही -मुंबई ब्युरोमध्ये प्रतिनिधी म्हणून काम केले. टिव्ही, प्रिंट आणि डिजिटल न्यूज माध्यम क्षेत्रात २३ वर्ष काम करण्याचा अनुभव. राजकारण, अर्थजगत, आंतरराष्ट्रीय घडामोडी या विषयांवर नियमित लिखाण.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर