राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु असून राजकीय पक्षातील नेत्यांकडून प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. राज्यातील अनेक मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे. त्यातच आता आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट करत खळबळ उडवून दिली आहे.
आदित्य ठाकरे यांनी एका हिंदी न्यूज वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत शिवसेनेतील बंडखोरीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. या मुलाखतीत आदित्य ठाकरेंनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. तत्कालीन राजकीय परिस्थिती आणि शिवसेना फुटीवर रोखठोक मत मांडले आहे.
२०१९ च्या निवडणुकीनंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आदि पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन करून सरकार बनवले होते. त्यानंतर अनेक नाट्यमयपूर्ण आणि धक्कादायक घडामोडी घडत राहिल्या. २२ जून २०२२ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेमध्ये बंड घडवून आणलं आणि महाराष्ट्रात सत्तांतर होऊन महायुतीचे सरकार स्थापन झालं. या सत्तास्थापनेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व ४० आमदारांनी सूरत, गुवाहाटी ते गोवा असा प्रवास केला होता. या बंडाबाबत आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले की, १९ जून रोजी शिवसेनेचा स्थापना दिवस असतो आणि २० जून २०२२ रोजी विधान परिषद आमदारांसाठी मतदान होते. विधान परिषदेच्या दोन्ही आमदारांसाठी आम्ही शेवटच्या वेळी कोटा बदलला आणि आमचे आमदार जिंकले. पण मतमोजणी सुरू असतानाच ते पळून गेले. पहिल्यांदा आम्हाला वाटले यांच्यासोबत १२ लोक आहेत. दिवस जास्तीत जास्त पुढे गेले तसे अनेक मंत्री त्यांच्यासोबत होते.
राज्यसभा निवडणुकीत आमचा पराभव झाला होता. त्यानंतर आम्ही अयोध्येला गेलो होतो, मख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अयोध्येवरुनच पळून जाण्याची योजना होती. उद्धव ठाकरे यांना या सर्व गोष्टी माहिती असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच यासाठी बऱ्याच आधीपासून तयारी सुरु असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरे म्हणले २०२१ पासून त्यांची तयारी सुरू होती. एकाच वेळी दोन गोष्टी सुरू होत्या. एकीकडे माझ्या वडिलांवर दोन शस्त्रक्रिया झाल्या. त्यांना जास्त हात पाय हलवता येत नव्हते. त्याच दरम्यावर एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीयांवर ईडीने कारवाई केली होती. एकनाथ शिंदे यांनाही सांगितलं होतं की तुम्ही जर सोबत आलं नाही तर तुम्हालाही आत जावं लागेल.
२० मे २०२२ रोजी मी दावोसमध्ये असताना एकनाथ शिंदे यांना वर्षा बंगल्यावर बोलवण्यात आलं होतं. तेव्हा उद्धव ठाकरेंनी त्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे का, असे विचारले होते. तसेच तुम्ही जे करताय ते माझ्या कानावर येतंय, तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं तर व्हा, पण पक्षासोबत गद्दारी करू नका. त्यानंतर एकनाथ शिंदे रडायला लागले आणि म्हणाले माझं तुरुंगात जाण्याचे वय नाही. मी भाजपला खोटं सांगत आहे की मी त्यांच्याकडे येणार आहे. पण हे खरं नाहीये.
१० जून रोजी राज्यसभेच्या निवडणुकीत त्यांनी आमचा एक उमेदवार पडला. त्यानंतर १५ जूनला माझ्यासोबत ते अयोध्येला आले. तेव्हाच त्यांची योजना होती की तिथून पळून जायचे. सगळी तयारी झाली होती कोण कुठल्या विमानात बसणार याची तयारी झाली होती. पण हे सगळं आम्हाला कळलं होतं, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं.
त्यानंतर एकनाथ शिंदेंनी सूरतमधूनही उद्धव ठाकरेंना कॉल केला होता. त्यावेळी फोनवर ते रडले होते. आता मागे फिरलो तर लोक मला संपवतील. ते उद्धव ठाकरेंसमोर अनेकदा रडले आहेत. मुख्यमंत्री आजारी होते. त्यांना उद्धव ठाकरेंची चिंता नव्हती. जेलमध्ये जायचं नाही तर हे सरकार आपण पाडू, असा विचार शिंदेंचा होता, तसेच पक्षप्रमुख आजारी आहेत, आपले भवितव्य काय, असा विचारही ते करत होते. धक्कादायक गौप्यस्फोट आदित्य ठाकरेंनी केला.