मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Aaditya Thackeray : या निकालाने लोकशाहीची हत्या झाली; कायदेशीर लढाई लढणार, आदित्य ठाकरेंचे सुतोवाच

Aaditya Thackeray : या निकालाने लोकशाहीची हत्या झाली; कायदेशीर लढाई लढणार, आदित्य ठाकरेंचे सुतोवाच

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 10, 2024 06:45 PM IST

Aaditya Thackeray on Mla Disqualification Result : नार्वेकर यांच्याकडून काय अपेक्षा करायची, कारण सर्व काही सेटिंग आधीच झालीय, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

Aaditya Thackeray
Aaditya Thackeray

संपूर्ण राज्याचे तसेच देशाचे लक्ष लागून राहिलेल्या शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा देत खरी शिवसेना शिंदेंचीच तसेच भरत गोगावले हेच प्रतोद असल्याचे व त्यांनी बजावलेला व्हीपच वैध असल्याचा निकाल नार्वेकर यांनी दिला आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नार्वेकर यांच्याकडून काय अपेक्षा करायची, कारण सर्व काही सेटिंग आधीच झालीय, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. 

शिवसेना कोणाची हा विधानसभा अध्यक्ष यांनी  दिलेला निर्णय  निर्लज्जपणाचा कळस आहे, लोकशाहीच्या हत्या करणारा आहे. भाजपाला आपलं संविधान बदलायचंय. राहुल नार्वेकर अनेक वर्षे आमच्या पक्षात होते, तेव्हा ते कुठल्या पक्षप्रमुखाच्या तिकिटावर लढत होते? असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित करत राहुल नार्वेकरांवर निशाणा साधला. 

लोकशाहीची एवढी निर्लज्ज हत्या मी कधी पाहिली नाही. लोकशाहीमध्ये खोके सरकारची उलट तपासणी आता जनताच करेल. सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षा आहे, पण जास्त अपेक्षा जनतेकडून आहे. या निर्णयाविरोधात कायदेशीर लढाई लढली जाईल, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं. 

निकालाचे वाचन करताना नार्वेकर म्हणाले की, माझ्यासमोर दोन्ही गटाने पुरावे सादर केले. शिवसेनेच्या पक्ष घटनेचाही विचार निकषात केला गेला आहे. निकाल देताना शिवसेनेची २०१८ ची घटना लक्षात घेतली. विधिमंडळातील बहुमतदेखील ग्राह्य धरले गेले. दोन्ही गटात पक्षप्रमुख पदावरून मतभेद आहेत. त्यामुळे राजकीय पक्ष कोणता हे प्रथमदर्शनी ठरवले गेले. पक्ष कुणाचा याबाबत निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय विचारात घेतला गेल्याचे त्यांनी सांगितले..

शिवसेना हा पक्ष कोणाचा, यावर निर्णय देताना पक्षाची घटना, नेतृत्वाची रचना आणि विधिमंडळ पक्ष याचा विचार करण्यात आला. निवडणूक आयोगात असलेली शिवसेनेची घटना ही ग्राह्य धरण्यात आली. शिवसेनेच्या घटनेतील बदल हे निवडणूक आयोगातील घटनेत आढळले नसल्याचे विधानसभा अध्यक्षांनी म्हटले. 

निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार एकनाथ शिंदे गटाकडे असलेली शिवसेना खरी आहे. निवडणूक आयोगाचा हा निर्णय मी लक्षात ठेवला. २०१८ मध्ये पक्षात निवडणूक न घेता नियुक्त्या करण्यात आल्या. त्यामुळे २०१८ मधील बदल ग्राह्य धरता येत नसल्याचे नार्वेकर म्हणाले.

WhatsApp channel