मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना केबिन देण्यात आल्यानं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शिंदे सरकारच्या आदेशाने पालिका प्रशासनाने बाजार समिती आणि शिक्षण समितीच्या केबिनमंत्री लोढा यांना दिल्या आहेत. पालिका प्रशासनाच्या या निर्णयाचा शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे व काँग्रेस नेते भाई जगताप यांनी कडाडून विरोध केला आहे.
मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनामुंबईमहापालिकेच्या मुख्य कार्यालयात केबिन दिली आहे. त्यावर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आक्षेप घेतला असून पालकमंत्र्यांना महापालिकेत केबिन कशासाठी? त्यांचा महापालिकेशी संबंध काय? असा सवाल करत,त्यांनी तात्काळ आपलं कार्यालय खाली करावं अशी मागणी केली आहे. येत्या २४ तासात महापालिकेतील कार्यालय रिकामं केलं नाही तर मुंबईकर आपला राग दाखवतील, असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.
माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, आम्ही मंत्री असताना महापालिकेत अनेकबैठका घेतल्या, मात्र दालन हडपलं नाही. थांबलं पाहिजे. नाहीतर राज्यातील प्रत्येक शहराच्या महापौरांना मंत्रालयात केबिन दिली पाहिजे. आम्हाला मुंबईचे आमदार म्हणून महापालिकेत केबिन दिली पाहिजे. या दालनात पालकमंत्री नाहीत तर भाजपचे माजी नगरसेवक बसले होते. नगरसेवकांची कार्यालये बंद केली. पण आता हे महापालिकेत घुसखोरी करून दादागिरी करत आहेत. हुकूमशाही चालवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
काँग्रेस नेते भाई जगताप म्हणाले की, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई महानगरपालिकेत कसे काय कार्यालय थाटले? मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिका लोढांना आंदण दिली का?? लोढा यांनी महापालिकेतील केबिन ताबडतोब रिकामी करावी, अन्य मुंबईकर तुम्हाला तेथून खेचून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाहीत.
मुंबई महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच पालकमंत्र्यांना मुख्यालयात ऑफिस देण्यात आले आहे. मुंबई शहर आणि उपनगर असे २ पालकमंत्री मुंबईला आहेत. मुंबई शहरासाठी दीपक केसरकर तर उपनगरासाठी मंगलप्रभात लोढा यांच्याकडे जबाबदारी आहे. आज पालिकेच्या शिक्षण समिती, बाजार समिती सभापतींच्या केबिनला पालकमंत्र्यांच्या नावाची पाटी लावल्याचे दिसले. त्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
संबंधित बातम्या