Mumbai Pune express way block today : मुंबई पुणे एक्सप्रेसवे ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. जर तुम्ही आज एक्सप्रेस वे ने प्रवास करणार असाल तर ही बातमी वाचा. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज मंगळवारी (दि १३) दोन तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. दुपारी १२ ते २ दरम्यान सर्व प्रकारची वाहतूक ही बंद ठेवण्यात येणार असून ती पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळने (एमएसआरडीसी) दिली आहे.
यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत मुंबई वाहिनीवर कि.मी १५.७५० येथे गॅन्ट्री बसविण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सुरू आहे. यामुळे मंगळवारी दुपारी १२ ते २ या वेळेत मुंबई वाहिनीवरील सर्व प्रकारच्या हलक्या व जड अवजड वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद राहणार आहे.
वाहनधारकांना पर्यायी मार्गाने प्रवास करावा असे आवाहन करण्यात आले आहे. द्रुतगती मार्गावरुन पुणे ते मुंबई वाहिनीवरील (पुण्याहुन मुंबईकडे येणारी) हलकी वाहने मुंबई वाहिनीवर लेन कि.मी ५५.००० वरुन वळवुन मुंबई- पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ या जुन्या पुणे-मुंबई मार्गावरुन मार्गस्थ होतील.
द्रुतगती मार्गावरुन पुणे ते मुंबई वाहिनीवरील (पुण्याहुन मुंबईकडे येणारी) हलकी वाहने व बसेस खोपोली एक्झिट कि.मी ३९.८०० येथून वळवून राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ या जुना पुणे- मुंबई महामार्गावरुन खोपोली शहरातून पुढे शेंडूग टोल नाका मार्गे मुंबई वाहिनीवरुन मार्गस्थ होतील, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कळविले आहे.
गॅन्ट्री बसविण्याचे काम पूर्ण झाल्यावर दुपारी २ वाजता द्रुतगती मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. दरम्यान ब्लॉक कालावधीत वाहनचालकांना काही अडचण असल्यास त्यांनी मदतीसाठी मुंबई- पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने केले आहे.
मुंबई-पुणे महामार्गावर दररोज लाखोंच्या संख्येने वाहनं ये-जा करत असतात. परंतु गेली काही दिवसांपासूंन या मार्गावर सातत्याने या कामासाठी मेगा ब्लॉक घेतला जात आहे. यामुळे वाहनचालकांना मनस्ताप होत आहे. या मार्गावर अपघात आणि अपघाताची संख्या कमी करण्यासाठी इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे.
संबंधित बातम्या