मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पंढरपूरमध्ये संतापजनक घटना, भंगारवाल्याचा मूर्खपणा आणि ६९ बालकांच्या जीवाशी खेळ
मनजीवन हॉस्पिटल
मनजीवन हॉस्पिटल (हिंदुस्तान टाइम्स)

पंढरपूरमध्ये संतापजनक घटना, भंगारवाल्याचा मूर्खपणा आणि ६९ बालकांच्या जीवाशी खेळ

20 May 2022, 17:14 ISTDilip Ramchandra Vaze

पंढरपूरमध्ये एका भंगारवाल्यानं ६९ नवजात शिशूंच्या जीवाशी खेळ केल्याचा संतापजनक प्रकार पाहायला मिळाला आहे. हॉस्पिटलच्या इन्वर्टरची बॅटरी चोरुन न्यायच्या नादात त्यानं या बालकांच्या जीवाशी खेळ केला आहे.

अत्यंत संतापजनक, निंदनीय प्रकार आज पंढरपूर इथं पाहायला मिळाला. एका भंगारवाल्याने केलेल्या चोरीची शिक्षा अतिदक्षता विभागात असलेल्या ६९ नवजातांच्या जीवावर बेतता बेतता राहिलीय. पोलिसांनी या भंगारवाल्याला अटक केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

याबाबत घडलेली ही घटना अशी की, सोलापूर जिल्ह्यातील लहान मुलांचं नावाजलेलं हॉस्पिटल म्हणून पंढरपूर येथील डॉ शीतल शहा यांच्या नवजीवन हॉस्पिटलचे नाव घेतलं जातं. अत्यंत अद्ययावत मशिनरी, तज्ज्ञ वैद्यकीय स्टाफ यामुळे राज्यातल्या अनेक गंभीर आजारी मुलांना इथंच उपचारासाठी आणलं जातं. या रुग्णालयाच्या लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात १०० पेक्षा जास्त नवजात शिशूंवर शस्त्रक्रिया आणि उपचार होत असतात. १९ मे रोजी दुपारी एकाच्या सुमारास अचानक वीज गेल्यावर जनरेटर सुरु करण्यासाठी या रुग्णालयाचे कर्मचारी गेले खरे. मात्र तिथं त्यानी या भंगारवाल्याला तेथील बॅटरी, वायर तोडून चोरुन नेत असताना पाहिलं. त्यांनी आरडाओरडा केल्यानं हा भंगारवाला हातातली बॅटरी तिथेच टाकून पसार झाला खरा. मात्र याहुन भयंकर प्रकार आत घडला. आत अतिदक्षता विभागात असलेली ६९ बालकं ऑक्सिजनच्या अभावी तडफडू लागली. मात्र डॉक्टरांनी आणि तिथल्या स्टाफने वेळीच धावपळ करत अनर्थ टाळला. मात्र झालेल्या घटनेनं रुग्णालयात मात्र काही काळ भीतीचं वातावरण होतं.

 

<p>नवजीवन हॉस्पिटल</p>
नवजीवन हॉस्पिटल (हिंदुस्तान टाइम्स)

रुग्णालयांमध्ये वीज गेल्यावर जनरेटर सुरु केला जातो तो अत्यावश्यक व्यक्तींना कोणत्याही प्रकारे वैद्यकीय सुविधेत बाधा येऊ नये यासाठी. या जनरेटरचा जीव असतो तो म्हणजे त्यातली बॅटरी. याच बॅटरीला बाजारात चांगली किंमत मिळत असल्याने या भंगारवाल्यानं पुढचा मागचा कोणताही विचार न करता रुग्णालयाच्या जनरेटरमधली बॅटरी काढली. त्याच्या या कृतीनं ६९ बालकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकला असता याचा साधा विचारही त्या भंगारवाल्याच्या मनाला शिवला नसणार.

सध्या हा भंगारवाला पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलीस पुढचा तपास करत आहेत.डॉक्टरांचं आणि रुग्णालयातल्या स्टाफचं मात्र सोलापूरमध्ये कौतुक होत आहे.