Pune Crime : बिबट्याची शिकार करुन नखं पंजा लपवला फार्महाऊसच्या कपाटात ; दोन उद्योजक बंधूविरोधात गुन्हा दाखल
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime : बिबट्याची शिकार करुन नखं पंजा लपवला फार्महाऊसच्या कपाटात ; दोन उद्योजक बंधूविरोधात गुन्हा दाखल

Pune Crime : बिबट्याची शिकार करुन नखं पंजा लपवला फार्महाऊसच्या कपाटात ; दोन उद्योजक बंधूविरोधात गुन्हा दाखल

Published Aug 22, 2023 08:07 AM IST

Pune crime : बिबट्याची शिकार करून अवयव खडकवासला धरणालगत मांडवी बुद्रुक येथील फार्महाऊसमध्ये लपवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Leopard hunt in Pune
Leopard hunt in Pune (HT)

पुणे : बिबट्याची शिकार केल्यानंतर त्याचे अवयव खडकवासला धरणालगत मांडवी बुद्रुक परिसरातील फार्महाऊसमध्ये लपवून ठेवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वन विभागाने फार्महाउसवर छापा टाकून बिबट्याच्या नखांसह पंजा जप्त केला आहे. याप्रकरणी दोन उद्योजक भावडांविरूद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sinhgad : सिंहगडावर फिरण्यासाठी जाताय! आता Gpay ने काढा तिकीट, वनविभागाचा नवा उपक्रम

विश्वजीत विनायकराव जाधव आणि अभिजित विनायकराव जाधव (दोघे रा. डेक्कन जिमखाना ) यांच्याविरुद्ध हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपी पसार असून, त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फर्ग्युसन रस्त्यावरील हॉटेल वैशालीच्या मालकी हक्काच्या वादातून जाधव बंधूंविरुद्ध यापूर्वी गुन्हा दाखल आहे. त्याबाबत जबाब नोंदविताना फिर्यादी महिलेने आरोपींकडे बिबट्याचे कातडे असल्याचे नमूद केले होते. याप्रकरणी वन विभागाकडेही तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार तपासादरम्यान खडकवासला धरण परिसरातील मांडवी खुर्द गावातील शेट्टी फार्म हाऊसमध्ये बिबट्याची शिकार करुन अवयव लपवून ठेवले असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती.

Pune Crime : चोराचं नशिबचं फुटकं! तीनपत्ती खेळण्यासाठी केली घरफोडी; चोरलेली ११ लाखांची रक्कमही हरवून बसला

त्यानंतर उपवनसंरक्षक महादेव मोहिते, सहायक वनसंरक्षक दीपक पवार, भांबुर्डा वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ, डोणजे वनपरिमंडळ अधिकारी सचिन सपकाळ आणि पथकाने रविवारी फार्महाऊसवर छापा टाकला. त्यावेळी तेथील कपाटात बिबट्याचा नखांसह पंजा सापडला.

प्रसिद्ध वैशाली हॉटेलमध्ये टोळक्याने तोडफोड करुन कामगारांना मारहाण केल्याची घटना दोन महिन्यापूर्वी घडली होती. याप्रकरणी विश्वजित जाधव याच्यासह चौघांविरुद्ध डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. हॉटेलच्या मालकी हक्कावरून जाधव याचे मूळ मालक जगन्नाथ शेट्टी यांची कन्या आणि पत्नी निकिता यांच्यात वाद सुरू आहे. जाधवने बंदुकीचा धाक दाखवून मालकी हक्काची कागदपत्रे तयार केल्याचा आरोप निकिता यांनी केला होता.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर