Jejuri Gadhav Bazar : ‘गाढव’ हा शब्द एखाद्याला कमी लेखण्यासाठी किंवा निर्बुद्ध ठरविण्यासाठी वापरला जातो. मात्र, या प्राण्याची उपयुक्तता व किंमत आजही कमी झालेली नाही. पुणे जिल्ह्यातील जेजूरी येथे पौष पौर्णिमा यात्रेनिमित्त गाढवांचा बाजार भरला असून या बाजारात तब्बल २ कोटी रुपयांची उलाढाल झाली. गावरान गाढवांना ३५ हजारापर्यंत तर गुजरातहून आलेल्या काठेवाडी गाढवांना ४० हजारापासून एक लाख रुपयांपर्यंत दर मिळाला. या बाजारात गाढवे खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातून व्यापारी आले होते.
पौष पौर्णिमा खंडेरायाच्या यात्रोत्सवानिमित्त गडकोटाच्या पायथ्याशी असलेल्या बंगाली पटांगणात दरवर्षी गाढवांचा बाजार भरतो. या वर्षी ही हा बाजार भरला असून गुजरात (काठेवाड), राजस्थान व महाराष्ट्र (गावठी), आदी १५०० हून अधिक विविध प्रकारच्या जातींची गाढवे या बाजारात विक्रीसाठी दाखल झाली आहेत. या वर्षी खरेदी-विक्रीतून तब्बल दोन कोटी रुपयांपर्यंत उलाढाल झाली आहे.
श्री खंडोबा देवाच्या जेजुरीनगरीत पौष पोर्णिमेनिमित्त पुरातन काळापासून गाढवांचा बाजार भरतो. यामध्ये माती वडार, गाडी वडार, मदारी, गारुडी, माकडवाले, कैकाडी, परीट, बेलदार, वडार, कुंभार, आदी समाजबांधव राज्याच्या विविध प्रांतांतून दाखल होत गाढवे खरेदी करतात. दातांवरून गाढवाचे वय ठरवले जाते. चार दात असलेल्या पशूला 'चौवान,' तर दोन दात असलेल्यास 'दुवान' म्हटले जाते. अक्कर म्हणजे ज्याला दात आलेले नाहीत असे छोटे पशू, यांना त्या मानाने किंमत कमी मिळते.
काठेवाड (गुजरात) पशूची किंमत ५० ते ७० हजार रुपये; तर महाराष्ट्रीय गावठी पशूची किंमत २० ते ३५ हजार रुपये मिळत आहे. याबाबत कंधार (जि. नांदेड) येथून गाढवे खरेदीसाठी आलेले किसन गोविंद तेलंगे यांनी सांगितले. यंदा पशुंच्या किमती आवाक्याबाहेर असून, नर कमी आणि मादी पशू विक्रीसाठी आलेल्या आहेत. काठेवाडी गाढवाची किंमत जास्त असल्याचे कोल्हार (जि. अहिल्यादेवीनगर) येथून आलेल्या दत्तू जाधव यांनी सांगितले.
गाढवाची किंमत त्यांच्या दातावरुन कळत असते. डोंगरावरच्या कामासाठी गाढवाचा उपयोग केला जातो. गाढवाच्या दुधालाही चांगली किंमत आहे. पुण्यात शंभर रुपयात एक चमचा एवढी किंमत आहे. ओझं वाहण्याचा व्यवसाय करणारे गाढवं विकत घेतात. या मेळाव्यात विविध प्रकारचे गाढवं यंदा विक्रीला आले आहेत. अनेक चांगल्या जातींच्या गाढवाला चांगली किंमतदेखील मिळत आहे, असे एका व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे.
संबंधित बातम्या