Dead Body of Father and son found in Pune Narhe : पुण्यातील नऱ्हे गावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. येथील व्हिजन इंग्लिश मीडियम शाळेजवळ असणाऱ्या एका सोसायटीतील बंद फ्लॅटमध्ये वडील आणि मुलाचा मृतदेह आढळला. त्यांचा मृत्यूचे कारण अज्ञात आहे. नागरिक घातपाताचा संशय व्यक्त करत आहेत. सिंहगड रोड पोलीस घटनास्थळी जाऊन दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. या प्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अरुण पायगुडे (वय ६४ )आणि ओमकार पायगुडे (वय ३२) अशी मृतदेह सापडलेल्या पिता पुत्रांची नावे आहेत. याबाबत सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांनी दिलेल्या माहितीनुसार मृत अरुण पायगुडे हे रेल्वेतून निवृत्त झाले आहे. ते त्यांचा मुलगा ओमकारसह नऱ्हे परिसरात एका सदानिकेत राहत होते. त्यांच्या एका मुलीचे लग्न झाले असून ती सासरी राहण्यास आहे, तर काही वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले आहे. त्यामुळे फ्लॅटमध्ये पिता पुत्र हे दोघेच राहत होते.
दोन वर्षांपूर्वी ओमकार पायगुडे याचा अपघात झाला होता. यात त्याला गंभीर दुखापत झाली होती. दरम्यान, यामुळे त्याची मानसिक स्थिती बिघडलेली होती. त्यामुळे तो विचित्र वागत असल्याने घरातच बहुतांश वेळ असे. दोघाही वडील मुलाला दारू पिण्याचे व्यसन होते. त्यामुळे दोघेही रोज दारू पीत होते.
सोसायटीचा सुरक्षारक्षक पायगुडे हा त्यांच्या घरी कचरा घेण्यासाठी बुधवारी रात्री गेला होता. त्यावेळी त्याने आवाज दिला. मात्र, घरातून प्रतिसाद आला नाही. त्यामुळे त्याने दरवाजा ढकलून उघडून पाहिले असता, घरातील बेडवर दोघेही पडून असल्याचे दिसले. सुरक्षारक्षकाने आवाज देऊनही त्यांनी प्रतिसाद न दिल्याने त्याने याची माहिती सिंहगड रोड पोलिसांना दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येत दोघांची तपासणी केली असता त्यांच्या मृत्यू झाल्याचे आढळले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले असून ते ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. दोघांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात अंत्यसंस्कारासाठी गुरुवारी देण्यात आले.