या घटनेमुळे संतप्त झालेल्या लोकांनी शाळेवर हल्ला केला. संतप्त जमावाने मुख्याध्यापक कार्यालय आणि वर्गखोल्यांची तोडफोडही केली. या घटनेत जखमी झालेला विद्यार्थ्याला दवाखान्यात भरती करण्यात आले आहे. शाळेचा मालक संतोष कुमार याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी सांगितले की, नर्सरीतील मुलाने त्याच्या शाळेच्या बॅगमध्ये बंदूक लपून आणली होती. त्याने बॅगेतून बंदूक काढून तिसरीतील मुलावर गोळीबार केला. या गोळीबारामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अचानक झालेल्या गोळीबाळामुळे शाळेतील मुले भीतीने सैरावैरा पळू लागली होती. तर काही मुले भीतीने शाळेच्या मुख्य दरवाजाकडे धावू लागली. या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलाच्या कुटुंबीयांनी सांगितले की, त्यांच्या मुलाच्या हाताला गोळी चाटून गेली असून त्याला किरकोळ दुखापत झाली. या प्रकरणी पोलिस आणि शाळा प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली आहे. जेव्हा ते शाळेत पोहोचले तेव्हा त्यांना समजले की मुलाच्या हातात गोळी लागली आहे. घटनास्थळी बंदुकीचे मॅगझिनही पडलेले दिसले.
संतप्त नागरिकांनी शाळेसमोर आंदोलन केले. तसेच या प्रकरणी दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. पीडित मुलाचे काका मोहम्मद अफरोज यांनी दावा केला आहे की, ज्या मुलाला गोळी लागली आहे तो मुकेश यादवचा मुलगा आहे. त्याने वर्गात घुसून माझ्या मुलाच्या छातीत गोळी मारण्याचा प्रयत्न केला, मात्र, सुदैवाने गोळी छातीऐवजी हाताला लागली. मुकेश त्याच्या मुलासह बंदुक घेऊन पळून फरार झाला आहे.
सुपौल पोलिस अधीक्षकांनी हिंदुस्तान टाईम्सला सांगितले की, गोळीबार करणारा नर्सरीतील मुलगा हा त्याच शाळेत शिकतो. त्याने त्याच्या बॅगेत बंदूक आणली होती. त्याने शाळेतील तीसरीत असणाऱ्या एका मुलावर गोळी झाडली आहे. मुलाची प्रकृती स्थिर असून धोक्याबाहेर आहे. आरोपी मुलगा व त्याच्या पालकांचा शोध सुरू आहे. मुलगा व त्याच्या पालकांविरुद्ध त्रिवेणीगंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमागचा हेतू समोर आला नाही. पोलिस या प्रकरणी तपास करत आहेत. याबाबत आम्ही गावकरी आणि शाळेतील लोकांकडे चौकशी करत असल्याचे अधिक्षकांनी सांगितले.
संबंधित बातम्या