Jayant Patil on Jaykumar Gore scam : कोविड महामारीच्या काळात एका रुग्णालयानं मेलेल्या व्यक्तींना जिवंत दाखवून सरकारकडून मिळणारे पैसे लाटले. या प्रकरणातील मुख्य आरोपी हे भाजपचे आमदार जयकुमार गोरे आहेत, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी आज विधानसभेत केला.
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील मौजे मायणी इथं श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर या संस्थेच्या अंतर्गत इन्स्टिट्यूट ऑफ द मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर या नावानं वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आहे. सन २०२० मध्ये देशभरात कोरोना रोगाचा संसर्ग व फैलाव झाला होता. कोविड - १९ च्या रुग्णांवर उपचार करताना या रुग्णालयाचे तत्कालीन अध्यक्ष, सचिव, खजिनदार व इतरांनी महात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी अनेक मयत लोकांना जिवंत दाखवून त्यांच्यावर उपचार केल्याचं आढळून आलं आहे, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.
आधी या रुग्णालयानं महात्मा फुले जनआरोग्य योजनेसाठी करारनामा करताना बोगस डॉक्टर दाखवले आहेत. यातील डॉक्टर नमूद काळात सदर रुग्णालयात कार्यरत नव्हते व त्यांनी कोणत्याही रुग्णांवर कोणत्याही प्रकारचे उपचार केलेले नाहीत. या हॉस्पिटलची चौकशी झाली तेव्हा डॉ. शशिकांत कुंभार यांनी चौकशी समितीला असं लिहून दिलं की, मी या हॉस्पिटलमध्ये कार्यरत नाही. कुंभार हे एकटे नसून असे एकूण ४६ डॉक्टर आहेत. रुग्णालयाच्या संचालक मंडळानं स्वतःच्या फायद्यासाठी डॉक्टरांची नावं दाखवली आहेत. इतकंच नव्हे, संस्थेच्या संचालक मंडळाचा कोणताही ठराव न घेता, खोटी कागदपत्रे दाखवून, बोगस डॉक्टर दाखवून ३०० बेडचे रुग्णालय नुतनीकरणाचा प्रस्ताव सातारा जिल्हा परिषदेकडं सादर करून व हे नुतनीकरण प्रमाणपत्र महात्मा फुले जनआरोग्य योजनेशी करार करताना जोडून शासनाची व संस्थेची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली, असंही पाटील यांनी निदर्शनास आणलं.
या रुग्णालयात कोविड काळात २०० ते २५० रुग्णांचा मृत्यू झाला होता. मृत्यू पावलेल्या रुग्णांना जिवंत दाखवून महात्मा जोतीबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये दहा ते बारा दिवस उपचार दिला आहे असं दाखविलं आहे. सदर मृत रुग्णास डिस्चार्ज देताना सदर रुग्ण व्यवस्थित आहे असं दाखवून मयत झालेल्या रूग्णांच्या डिस्चार्ज फॉर्मवरती खोट्या सह्या केलेल्या आहेत. म्हणजेच, मयत रुग्ण हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झाले, मयत रुग्णांनी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले, शासकीय सवलतींचा लाभ घेतला इतकेच नव्हे तर महात्मा जोतीबा फुले जन आरोग्य योजनेच्या नियमानुसार रुग्णाचे समाधान पत्र घेतले जाते ते देखील भरून दिले आणि त्यानंतर राज्य परिवहन नियमानुसार परतीचा प्रवास खर्च पन्नास रुपये याचा देखील लाभ घेतला. हे सांगताना जयंत पाटील यांनी काही रुग्णांची नावंही सांगितली.
ज्या रुग्णांना ऑक्सिजेनची गरज नव्हती अशा रुग्णांनाही डिस्चार्ज देते वेळी आय.सी.यू बेडवर झोपवून, त्यांना व्हेंटिलेटर लावून फोटो काढलेले आहेत व हे फोटो योजनेच्या पोर्टलवरती अपलोड केलेले आहेत. विशेष म्हणजे रुग्णाला लावलेल्या व्हेंटिलेटरच्या आजूबाजूला कोणताही ऑक्सिजन पॉईंट नाही. ऑक्सिजनची नळी कुठेही जोडलेली नाही व फोटोमध्ये रुग्णाची ऑक्सीजन लेवल ३, ५, ७, ११, १५, १८, २० अशी दिसत आहे. व्हेंटीलेटरवर असलेल्या रूग्णास साधा सलाईन लावलेली दिसत नाही.
या रुग्णालयात ७ व्हेंटिलेटर होते, या हिशोबानं १० दिवसात फक्त ७ रुग्णच त्यावर उपचार घेऊ शकत होते. म्हणजेच जास्तीत जास्त २१ ते ३० रुग्ण त्याचा वापर करू शकत होते. परंतु व्हेंटिलेटरला ४० हजाराचे पॅकेज असल्यानं दीडशे ते दोनशे रुग्णांनी त्याचा वापर केला आहे असं दाखवून शासनाकडून पैसे उकळले आहेत, असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.
संबंधित बातम्या