
Mumbai Crime news : राज्यात निवडणुकीची घोषणा झाल्यापासून आचारसंहिता लागली आहे. या काळात पैशांचा पाऊस राज्यात पडत असल्याचे चित्र आहे. पुण्यात खेडशिवापुर येथे ५ कोटी तर हडपसर येथे नाकाबंदी दरम्यान, २२ लाख ९० हजार रुपये सापडले होते. त्यानंतर पुण्यापाठोपाठ आता मुंबईचया भुलेश्वर येथे देखील कोट्यवधींची मोठी रक्कम जप्त करण्यात आली आहे.
मुंबईच्या भुलेश्वरमधून पोलिसांनी तब्बल १ कोटी ३२ लाखांची रोकड जप्त केली आहे तर पाच जणांना अटक करण्यात आली आहे. हे पाच जण बॅगमधून ही रक्कम घेऊन जात होते. ही रक्कम नेमकी कुणाची आणि कुठे नेली जात होती याच तपास पोलिस करत आहेत. हे पाच जण बॅग घेऊन संशयित रित्या फिरत होते. पोलिसांनी त्यांना पाहिल्यावर त्यांना संशय आल्याने त्यांनी त्यांना हटकले. त्यांची तपासणी केली असता, त्यांच्या बॅगमध्ये त्यांना १ कोटी ३२ लाख रुपयांची रोकड सापडली. त्यांना या रक्कमे बद्दल विचारले असता त्यांना नीट उत्तरे देता आली नाही. त्यामुळे त्यांना पोलिस ठाण्यात आणून त्यांची चौकशी केली जात आहे. या प्रकरणी आयकर विभागाला माहिती देण्यात आली असून ते देखील या प्रकरणाचा तपास करत आहेत.
राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली असून राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत १५ ते २४ ऑक्टोबर २०२४ पर्यंत एकूण ९० कोटी ७४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यातील ५२ कोटी रुपये हे २४ तासात जप्त करण्यात आले आहे.
नागपूर, मुंबई उपनगर, रत्नागिरी ह्या जिल्ह्यांमधल्या मोठ्या कारवायांचा समावेश आहे. ह्यातून निवडणूक यंत्रणा दक्ष असून मतदारांना प्रलोभन दाखवण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा संदेश गेला आहे. प्रत्येक प्रकरणाचे मागील धागेदोरे तपास काढून गुन्ह्याची साखळी मोडून काढण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. सर्व मतदारांना आचारसंहिता भंगाचा प्रकार आढळल्यास आयोगाच्या सीव्हिजील अॅपवर तक्रार करता येते. ह्या तक्रारींची माहिती सर्व अंमलबजावणी यंत्रणांना दिली जात असल्याने आवश्यक ठिकाणी जप्तीची कारवाई केली जात आहे.
संबंधित बातम्या
