Palghar Rape and Murder News: राज्यातील महिला आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना पालघर जिल्ह्यातून धक्कादायक घटना उघडकीस आली. अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार केल्यानंतर तिची हत्या करून मृतदेह निर्जनस्थळी फेकून देण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगी मोखाडा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास होती. तिचा रविवारी (२७ ऑक्टोबर २०२४) वाढदिवस होता. दरम्यान, रविवारी संध्याकाळी घराच्या शेजारी तिचा वाढदिवस साजरा केला जात होता. वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपल्यानंतरही मुलगी घरी न परतल्याने पालकांनी चिंता व्यक्त केली. यानंतर नातेवाईकांनी मुलीचा शोध घेतला असता ११.३० वाजताच्या सुमारास ती घरापासून काही अंतरावर बेशुद्ध अवस्थेत आढळून आली.
मुलीच्या घरच्यांनी ताबडतोब तिला जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र, तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या मुलीवर अत्याचार झाल्याचेही वैद्यकीय तपासात निष्पन्न झाले. या मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिक रुग्णालयात पाठविण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच मुलीच्या नातेवाईकांनी आणि त्यांच्या शेजाऱ्यांनी मोखाडा पोलीस ठाण्यात प्रचंड गर्दी केली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्ह दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
मुंबईत गेल्या पाच वर्षांपासून आपल्या १७ वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या ४६ वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी अटक केली. वडिलांच्या शारिरिक छळाला वैतागून पीडित मुलगी प्रियकराच्या घरी गेली पळून गेली. मात्र, ती अल्पवयीन असल्याने प्रियकराच्या नातेवाईकांनी तिला घरात ठेवण्यास नकार दिला. तसेच तिला घरी परतण्यास सांगितले. दुसरीकडे, मुलीचे अपहरण झाल्याची शक्यता व्यक्त करत आरोपी पित्याने ताडदेव पोलिसांत तक्रार नोंदवली. पोलिसांनी तिचा फोन ट्रॅक करून तिला महालक्ष्मी स्थानकात शोधून काढले. पोलिसांनी तिच्याकडे विचारपूस केली असता तिने आपबीती त्यांना सांगितली. यानंतर पोलिसांनी आरोपी पित्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी १२ वर्षांची असल्यापासून तिचे वडील तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होते. तिने अनेकदा विरोध केला. मात्र, आरोपी तिला मारहाण किंवा जीवे मारण्याची धमकी देत असे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे.
संबंधित बातम्या