मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मरीन लाइन्स नव्हे आता 'मुंबादेवी'; मुंबईतील ७ रेल्वे स्थानकांची नावं बदलणार; पाहा यादी

मरीन लाइन्स नव्हे आता 'मुंबादेवी'; मुंबईतील ७ रेल्वे स्थानकांची नावं बदलणार; पाहा यादी

Jul 09, 2024 05:30 PM IST

Mumbai Railway Station : महाराष्ट्र विधान परिषदेत मुंबई लोकल ट्रेन मार्गावरील ७ स्टेशन्सचे नाव बदलण्याचा प्रस्ताव पारित केला आहे. हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे.

मरीन लाइन्ससह मुंबईतील ७ स्थानकांची नावे बदलणार
मरीन लाइन्ससह मुंबईतील ७ स्थानकांची नावे बदलणार

महाराष्ट्र विधीमंडळ पावसाळी अधिवेशनात मुंबईतील रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. आता हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. मंत्री दादा भुसे यांनी सभागृहात मुंबईतील रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा प्रस्ताव सादर केला, नावे बदलली जाणाऱ्या स्थानकांमध्ये करी रोड, सँडहर्स्ट रोड, मरीन लाइन्स, चर्नी रोड, कॉटन ग्रीन, डॉकयार्ड, किंग्ज सर्कल आदिंचा समावेश आहे.

ट्रेंडिंग न्यूज

महाराष्ट्र विधान परिषदेत मुंबई लोकल ट्रेन मार्गावरील ७ स्टेशन्सचे नाव बदलण्याचा प्रस्ताव पारित केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना,भाजप आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील एनसीपीच्या महायुती सरकारकडून हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे. राज्याचे संसदीय कामकाजमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या द्वारे सादर केलेला प्रस्ताव सर्वसंमतीने मंजूर करण्यात आला. मुंबई लोकल ट्रेन मार्गावरील अनेक स्टेशन्सची नावे इंग्रजी आहेत त्याचबरोबर ते वसाहतवादी वारसा दाखवतात, अशी तक्रार केली जाते.

या प्रस्तावानुसार करी रोड स्टेशनचे नाव बदलून लालबाग, सँडहर्स्ट रोडचे नाव डोंगरी, मरीन लाइन्सचे मुंबादेवी आणि चर्नी रोडचे नाव बदलून गिरगाव केले जाईल. सँडहर्स्ट रोड स्टेशनचे नाव सेंट्रल मार्गासोबतच हार्बर लाइनवरही बदलले जाईल. अन्य स्टेशन्समध्ये कॉटन ग्रीन स्टेशनचे नाव बदलून काळाचौकी, डॉकयार्ड रोडचे माझगाव आणि किंग सर्कलचे नाव तिर्थंकर पार्श्वनाथ केले जाईल. मुंबईमध्ये याआधीही अनेक स्टेशन्सची नावे बदलली गेली आहेत. जसे की, ऐतिहासिक स्टेशन व्हिक्टोरिया टर्मिनसचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि एलफिन्स्टन रोडचे नाव बदलून प्रभादेवी केले होते.

 

दरम्यान विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर शहरातील विमानतळाच्या नामांतराचा मुद्दा उपस्थित केला. या विमानतळाला अजूनही औरंगाबाद विमानतळ म्हटले जाते. उपाध्यक्ष नीलम गोऱ्हे यांनी यावर चर्चा करण्यास नकार देत म्हटले की, संबंधित मंत्री यावर नंतर उत्तर देऊ शकतात. महाराष्ट्र सरकारने याआधीही मराठावाड्यातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांची नावे बदलून क्रमश: संभाजीनगर आणि धाराशीव केले होते.

WhatsApp channel