जळगाव जिल्ह्यातील जामनेरमध्ये एका सहा वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला अटक केली आहे. आरोपीला पोलिसांनी पकडल्याचे समजताच जामनेर पोलीस ठाण्याच्या बाहेर शेकडोच्या संख्येने लोक जमा झाले. संतप्त जमावाने आरोपीला आपल्या ताब्यात देण्याची मागणी पोलिसांकडे केली. मात्र आरोपीला जमावाच्या ताब्यात देण्यास पोलिसांनी नकार देताच जमाव हिंसक झाला. पोलिसांनी आरोपीला सुरक्षित स्थळी नेल्याचे समजल्यावर जमावाने पोलीस ठाण्यावर जोरदार दगडफेक केली. यावेळी एका पेट्रोल पंपालाही आग लावली. (riots in jamner) या हल्ल्यात अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.
संतप्त जमावानं पोलीस ठाण्यावर दगडफेक केल्याने पोलीस स्टेशनच्या तसेच अनेक वाहनांच्या काचा फुटल्या आहेत. जमावानं एका पत्रकाराची दुचाकीही जाळली असून हिंसक जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार करत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.
जळगाव जिल्ह्यातील जामनेरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली असल्याने सामान्य माणूस पेटून उठला आहे. एका ६ वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना १५ दिवसापूर्वी घडली होती. त्यानंतर आरोपी सुभाष सोनवणे फरार झाला होता. त्याला १५ दिवसांनी भुसावळमधून ताब्यात घेतलं. ही माहिती बाहेर समजताच शहरातील लोक पोलीस स्टेशनबाहेर जमा झाले व आरोपीला ताब्यात देण्याची मागणी करू लागले. यासाठी जमावाने रास्ता रोकोही केला.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, जामनेरमध्ये दगडफेक व आगीच्या घटनेनंतर पोलीस बंदोबस्त कडक करण्यात आला आहे. यात घटनेत अनेक पोलीस जखमी झाले आहेत. त्यांनी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी फोनवरून संपूर्ण घटनेची माहिती घेतली असून कारवाईचे आदेश दिले आहेत.
जळगावचे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी सांगितले की, मुलीवर बलात्काराच्या आरोपीला अटक केल्यानंतर जमाव हिंसक झाला व कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला. जमावाने पोलिसांवर दगडफेक करत तोडफोड केली. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने सर्व लोकांना पकडले जाईल. सर्वांवर कारवाई केली जाईल. ही घटना गुरुवारी रात्री साडे १२ वाजण्याच्या सुमारास घडली.
संबंधित बातम्या