मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ahmednagar News : मांजरीला वाचवताना ६ जण बायोगॅसच्या २०० फूट खोल खड्ड्यात बुडाले, नगरमधील घटना

Ahmednagar News : मांजरीला वाचवताना ६ जण बायोगॅसच्या २०० फूट खोल खड्ड्यात बुडाले, नगरमधील घटना

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 09, 2024 07:21 PM IST

Ahmednagar News : मांजरीला वाचवताना सहा जण बायोगॅसच्या खड्ड्यात बुडाल्याची धक्कादायक घटना नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात घडली आहे. त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मांजरीला वाचवताना ६ जण बायोगॅसच्या २०० फूट खोल खड्ड्यात बुडाले
मांजरीला वाचवताना ६ जण बायोगॅसच्या २०० फूट खोल खड्ड्यात बुडाले

गुढीपाडव्याच्या दिवशीच अहमदनगर (Ahmednagar News) धक्कादायक घटनेनं हादरलं आहे. विरारमध्ये सेफ्टी टँकमध्ये बुडून ४ मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच अहमदनगरमध्ये एका मांजरीला वाचवण्याच्या प्रयत्नात ६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. बायोगॅसच्या खड्ड्यामध्ये (biogas plant)  पडलेल्या मांजरीला वाचवताना ६ जण बुडाल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यामधील वाकडी गावात घडली आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

बायोगॅसचा खड्डा २०० फूट खोल असून शेणाने भरलेला आहे. खड्ड्यामध्ये बुडालेल्या ६ जणांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तहसीलदारही घटनास्थळी पोहोचले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार वाकडी गावातील एका बायोगॅसच्या खड्ड्यात मांजर पडले होते. त्याला वाचवण्यासाठी एक जण खड्ड्यामध्ये उतरला. मांजराला खड्ड्यातून बाहेर काढण्याच्या प्रयत्नात तो स्वत: बुडू लागला. त्याला बुडताना पाहून अन्य पाच जण खड्ड्यामध्ये उतरले आणि पाहता-पाहता सर्वजण खड्ड्यामध्ये बुडाले. हा खड्डा जवळपास २०० फूट खोल आहे. २०० फूट विहिरीचे रुपांतर बायोगॅस प्रकल्पात केले होते. बायोगॅसचा खड्डा शेणाने भरलेला होता. त्यामध्ये अडकून सर्वजण बुडाले. खड्डा २०० फूट खोल अन् शेणाने भरलेला असल्याने बुडालेल्या लोकांना बाहेर काढणे, मोठे आव्हान आहे.

या घटनेची माहिती मिळताच अहमदनगर पोलिस पथक तसेच तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले. गावकऱ्यांच्या मदतीने खड्ड्यात बुडालेल्या सहा जणांना बाहेर काढण्यासाठी बचाव मोहीम सुरू केली. बायोगॅसच्या खड्ड्यामध्ये बुडालेल्या व्यक्तींची नावे समोर आली असून माणिक गोविंद काळे,  संदीप माणिक काळे, बबलू अनिल काळे, अनिल बापूराव काळे,  बाबासाहेब गायकवाड अशी त्यांची नावे असून एकाचे नाव समजू शकलेले नाही.

विरारमध्ये सेफ्टी टँकमध्ये बुडून चार मजुरांचा मृत्यू -

विरार पश्चिम येथील रुस्तुमजी शाळेच्या बाजूला असणाऱ्या सेफ्टी टँकची सफाई केली जात होती. यावेळी ४ मजुरांचा मृत्यू झाला आहे. एकापाठोपाठ चारही कर्मचाऱ्यांचा पाण्यात उतरल्याने मृत्यू झाला आहे. या घटनेत शुभम पारकर (वय २८), अमोल घाटाळ (वय २७), निखिल घाटाळ (वय २४) आणि सागर तेंडुलकर (वय २९) अशी मृतांची नाव आहे.

IPL_Entry_Point