500 rupees fine for throw waste in public places in pune : पुण्यात सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकला जात असून यामुळे शहराचे विद्रूपीकर होत असल्याने आता पुणे महानगर पालिकेने कठोर पावले उचलण्यास सुरू केली आहे. यापुढे, सार्वजनिक ठिकाणी, पदपथ आणि रस्त्यांवर कचरा टाकणाऱ्यांना आता थेट ५०० रुपये दंड भरावा लागणार आहे. यापूर्वी उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांना केवळ १८० रुपयांचा दंड आकारला जात होता. या दंड वाढीमुळे पुणेकर सुधारणार का ? आता हे पाहावे लागणार आहे.
पुणे शहरात कचऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. मोठ्या प्रमाणात कचरा हा उघड्यावर टाकला जातो. या साठी पदपथ आणि मोकळ्या जागांचा वापर केला जातो. हा कचरा बाहेर फेकला जाऊ नये या साठी पूर्वी केवळ १८० रुपये दंड वसूल केला जात होता. मात्र, आता हा दंड वाढवण्यात आला आहे. त्यामुळे जर आता मोकळ्या ठिकाणी कचरा टाकणे, लघुशंका करणे, थुंकणे, कचऱ्याचे वर्गीकरण न करणे, कचरा जाळणे, प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर, ओला कचरा जिरविण्यासाठी बल्क वेस्ट यंत्रणा कार्यान्वित न ठेवणे आढळल्यास थेट ५०० रुपये दंड आकारण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.
या संदर्भात पुणे महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार म्हणाले, सार्वजनिक ठिकाणी, उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांना १८० रुपये दंड केला जातो. ही रक्कम पूर्वीच निश्चित करण्यात आली होती. अशा प्रकारांना आळा बसावा, यासाठी अशा प्रकरणात प्रत्येकी ५०० रुपये दंड आकारण्यात यावा, असा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार केला आहे. शासनाच्या मान्यतेनंतर हा दंड आकारला जाणार आहे.
घनकचरा व्यवस्थापन विभागाचा हा प्रस्ताव अतिरिक्त आयुक्तांच्या मान्यतेनुसार आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर स्थायी समिती आणि मुख्य सभेच्या मान्यतेनंतर तो राज्य शासनाकडे तो पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर या प्रस्तावाची अंमलबजावणी केली जाणार आहे. या पूर्वी रस्त्यावर कचरा टाकतांना आढळल्यास नागरीक थेट दंडाची १८० रुपये देऊन टाकत होते. मात्र, आता ५०० रुपये दंड केला तरी बाहेर कचरा टाकल्याचे थांबणार का हा देखील प्रश्न आहे.
संबंधित बातम्या