Nagpur factory blast news : ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली एमआयडीसीतील स्फोटाची घटना ताजी असतानाच आता राज्याची उपराजधानी नागपूर स्फोटानं हादरली आहे. नागपूरच्या धामना येथील स्फोटक निर्मिती कारखान्यात आज स्फोट झाला. त्यात ५ कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ४ महिलांचा समावेश असल्याचं समजतं.
हा स्फोट नेमका कशामुळं झाला याची माहिती मिळू शकली नाही. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शहरापासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या हिंगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील धामणा गावातील चामुंडी एक्सप्लोसिव्ह प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत हा स्फोट झाला.
पीटीआयनं दिलेल्या वृत्तानुसार, दुपारी एकच्या सुमारास कामगार स्फोटकं पॅक करत असताना हा स्फोट झाला. स्फोटामध्ये मृत्यू झालेल्या कामगारांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात आणण्यात आले आहेत. जखमींपैकी तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलीस, गुन्हे शाखा आणि वरिष्ठ अधिकारी स्फोटाच्या ठिकाणी पोहोचले आहेत. या घटनेची माहिती घेण्याचं काम सुरू आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी दिली.
स्फोट आणि आगीच्या घटनांची मालिका
गेल्या महिन्यात ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीतील औद्योगिक वसाहतीत २३ मे रोजी लागलेल्या भीषण आगीत पाच जणांचा मृत्यू झाला होता, तर ५६ जण गंभीर जखमी झाले होते. त्याआधी १८ जानेवारी रोजी ठाण्यातील एका केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटांत एका कामगाराचा मृत्यू झाला आणि चार जण जखमी झाले होते. स्फोटामुळं तिथं आगही भडकली होती. त्यानंतर १२ जून रोजी, म्हणजे कालच डोंबिवली एमआयडीसीत आणखी एका कारखान्यात आग लागली होती. ती घटना ताजी असतानाच आज नागपूरमध्ये ही दुर्घटना घडली.
संबंधित बातम्या