Four brother and sister drown in Chalisgaon : आज संपूर्ण राज्यात रक्षाबंधन सण साजरा केला जाणार आहे. भाऊ आणि बहीणीच्या अतूट नात्याच्या या सणाच्या पूर्वसंध्येला जळगाव जिल्ह्यात हृदयद्रावक घटना घडली आहे. चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेड गावाच्या परिसरातील नदीवर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याच्या परिसरात खेळण्यासाठी गेलेल्या चार सख्ख्या बहीण- भाऊंचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि १८) संध्याकाळी ५ ते ६ च्या दरम्यान घडली.
रोशनी सुभाषसिंग आर्य (वय ९), शिवांजली सुभाषसिंग आर्य (वय ८), आर्यन सुभाषसिंग आर्य (वय ३), आराध्या सुभाषसिंग आर्य (वय ४, सर्व रा. दुगणी तहसील ता. सेंधवा जिल्हा बडवणी) अशी बंधाऱ्यात बुडून मृत्यूमुखी पडलेल्या मुलांची नावे आहे. या घटनेमुळे गायवर शोककळा पसरली आहे.
या घटनेचे वृत्त असे की, चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेड गावात आर्य कुटुंबीय हे मजूर म्हणून येथील उदय सुधाकर अहिरे यांच्याकडे कामाला आहे. आर्य यांच्या कुटुंबात ५ मुली, १ मुलगा आहेत. परिवारातील मोठी मुलगी ही भांडी घासण्यासाठी गावातील के. टी. वेअर बंधाऱ्याच्या काठावर गेली होती. तिच्या सोबत तिचे भावंड देखील गेले होते. बंधाऱ्याच्या शेजारी खेळत असतांना त्यांचा पाय घसरला यामुळे ते पाण्यात बुडाले. एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात चारही सख्खे बहीणभाऊ बुडाले.
ही बाब गावातील नागरिकांना समजताच त्यांनी बंधाऱ्याच्या दिशेने धाव घेतली. तर काहींनी यांची माहिती पोलिसांना दिली. ग्रामस्थ व पोलिस घटनास्थळी पोहोचल्यावर सर्वांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह चाळीसगाव उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. यावेळी कुटुंबियांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. या प्रकारणी घटनेबद्दल चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला रात्री उशिरा नोंद करण्याचे काम सुरु होते.
सोलापूर जिल्ह्यात देखील रक्षाबंधनासाठी कारमधून गावाकडे जात असतांना झालेल्या कारच्या अपघातात बहीण-भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला. पंढरपूर-मंगळवेढा मार्गावर गोपाळपूर हद्दीत ही घटना घडली. स्विफ्ट कार व आयशर टेम्पोची धडक झलयाने हा अपघात झाला. रविवारी सायंकाळी साडे चार वाजता ही घटना घडली.यात स्विफ्ट कारमधील बहीण भाऊ रोहित तात्यासो जाधव (वय २५), ऋतुजा तात्यासो जाधव (वय १९) यांचा मृत्यू झाला.