Food poisoning Case In Wanleswadi High School Sangli : पोषण आहातून तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. सांगलीतील वानलेसवाडी हायस्कूलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला असून त्यानंतर आता महापालिकेच्या उपायुक्तांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. भात आणि आमटी खाल्यानंतर शाळेतील ३० विद्यार्थ्यांना उटल्या झाल्या, त्यानंतर आता सर्व बाधित विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं आता विषबाधेच्या प्रकरणामुळं संतापलेल्या पालकांनी शाळेत धाव घेत शालेय प्रशासनाची जाब विचारण्यास सुरुवात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सांगली महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या वानलेसवाडी हायस्कूलमध्ये दुपारच्या पोषक आहारात विद्यार्थ्यांना भात आणि आमटीचं जेवण देण्यात आलं होतं. दुपारचं जेवण केल्यानंतर सर्व विद्यार्थी वर्गात गेले, परंतु काही विद्यार्थ्यांना अचानक मळमळ आणि उलटी होऊ लागली. त्यानंतर या प्रकरणाची शाळा प्रशासनानं तातडीनं दखल घेत सर्व विद्यार्थ्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात हलवलं. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या सर्वच विद्यार्थ्यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती डॉ. सुधीर नणंदकर यांनी दिली आहे.
वानलेसवाडी हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना समोर आल्यानंतर सांगली महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील यांनी तातडीनं रुग्णालयात धाव घेत विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली आहे. त्यानंतर शाळा प्रशासनाला अन्नाचे नमुने घेण्याचे निर्देश देण्यात आले असून पोषण आहाराचा पुरवठा करणार्या महिला बचत गटाच्या प्रतिनिधींना बोलावून प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.