boat capsizes in pravara river : नदीत बुडालेल्या तरुणाचा शोध घेण्यासाठी पाण्यात उतरलेल्या SRDF पथकावर काळाने घाला घातला. प्रवरा नदीत बोट उलटल्याने तीन जवानांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील सुगाव गावाजवळ गुरुवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मोहिमेदरम्यान राज्य आपत्ती निवारण दलाचे (एसडीआरएफ) एक उपनिरीक्षक आणि दोन कॉन्स्टेबल यांना आपला जीव गमवावा लागला.
अहमदनगरचे पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी सांगितले की, बुधवारी दुपारी प्रवरा नदीत बुडून दोन तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यातील एका तरुणाचा मृतदेह बाहेर काढला होता. दुसऱ्या एका तरुणाचा शोध सुरू असताना ही घटना घडली. शोध पथकात एसडीआरएफचे चार जवान आणि एका नागरिकाचा समावेश होता.
बुधवारी प्रवारा नदीत बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाला. त्यापैकी एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पक्षाला यश आले असून दुसऱ्या व्यक्तीचा शोध सुरू होता. शोध मोहिमेसाठी एसडीआरएफच्या पथकाला धुळ्याहून पाचारण करण्यात आले होते, असे ओला यांनी सांगितले.
शोधमोहिमेदरम्यान एसडीआरएफच्या चार जवानांसह पाच जणांना घेऊन जाणारी बोट सकाळी पावणेसातच्या सुमारास प्रवरा नदीच्या भोवऱ्यात सापडली व मध्यभागी उलटली. एसडीआरएफच्या एका जवानाला वाचवण्यात यश आले मात्र अन्य तिघांना वाचवता आले नाही.
अधिकाऱ्याने सांगितले की, एसडीआरएफचे एक सब इन्स्पेक्टर आणि दोन कॉन्स्टेबलचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. बोटीवर त्यांच्यासोबत असलेला एक नागरिक अजूनही बेपत्ता आहे. त्याचा आणि बुधवारी बुडालेल्या तरुणांचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी (२२ मे) दुपारच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील अर्जुन रामदास जेडगुले (वय १८ वर्षे) आणि सिन्नर तालुक्यातील सागर पोपट जेडगुले (वय२५ वर्षे) हे दोन तरुण अंघोळीसाठी सुगाव बुद्रुक जवळील प्रवरा नदी पात्रात उतरले होते. पोहत असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघेजण बुडाले. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी सागर पोपट जेडगुले याचा मृतदेह बाहेर काढला. मात्र, अर्जुन जेडगुले याचा रात्री उशिरापर्यंत शोध घेऊनही त्याचा काहीच पत्ता लागला नव्हता.
दरम्यान आज ( २३ मे) सकाळी धुळे येथून SDRF च्या पथकाला पाचारण करण्यात आले. SDRF च्या जवानांनी शोधकार्य सुरु करताच काळानं त्यांच्यावर घाला घातला व तीन जवानांना आपला जीव गमवावा लागला. SDRF च्या इतर जवानांनी त्यांना वाचवण्यासाठी दुसरी बोट पाण्यात उतरवली. जीवाची बाजी लाऊन SDRF चे जवान सर्वांना वाचवण्याचे प्रयत्न करीत होते. त्यातील एकाला वाचवण्यात यश आले मात्र तिघांना आपले प्राण गमवावे लागले.