मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Gadchiroli Encounter : गडचिरोलीत सुरक्षा दल व नक्षलवाद्यांमध्ये चकमक, २ महिलांसह ३ नक्षलींचा खात्मा

Gadchiroli Encounter : गडचिरोलीत सुरक्षा दल व नक्षलवाद्यांमध्ये चकमक, २ महिलांसह ३ नक्षलींचा खात्मा

May 25, 2024 10:57 PM IST

Gadchiroli Encounter : सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत तीन नक्षली ठार झाले आहे. घटनास्थळावरून एके-४७ रायफल, कार्बाइन आणि इन्सास रायफलसह शस्त्रास्त्रांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे

सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत ३ नक्षलवादी ठार (Representative Image)
सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत ३ नक्षलवादी ठार (Representative Image)

छत्तीसगडच्या बस्तर जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील जंगलात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत दोन महिलांसह तीन संशयित नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. छत्तीगडनंतर सुरक्षा दलाने गडचिरोलीत मोठी कारवाई करत ३ नक्षलींचा खात्मा करत मोठा शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले की, प्रतिबंधित सीपीआय (माओवादी) गटाचे, विशेषत: पेरीमिली दलमचे सदस्य नक्षलवादी मोहिमेची (टीसीओसी) योजना आखत असल्याची माहिती मिळाली होती. या गोपनीय माहितीच्या आधारे अतिरिक्त पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सी-६० कमांडोच्या दोन तुकड्या सोमवारी सकाळी भामरागड तालुक्यातील कटरंगट्टा गावाजवळील जंगलात शोध मोहिमेसाठी तातडीने रवाना करण्यात आल्या.

शोधमोहिमेदरम्यान तेथे तळ ठोकून असलेल्या नक्षलवाद्यांनी कमांडोंवर अंदाधुंद गोळीबार केला, याला सी-६० जवानांनी प्रत्युत्तर दिले. दोन्ही बाजुंनी जवळपास तासभर गोळीबार झाला, परिणामी दहशतवादी पळून गेले. घटनास्थळी एक पुरुष आणि दोन महिला नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून आले..

भाकप (माओवादी) चा वरिष्ठ नेता आणि गडचिरोली जिल्ह्यातील पेरीमिली दलमचा प्रभारी सह कमांडर वासू समर कोरचा (३६), पथकातील वरिष्ठ सदस्य रेश्मा मडकम (२५) आणि पेरिमिली दलमच्या दलम सदस्या कमला मडावी (२४) अशी ठार झालेल्या माओवाद्यांची नावे आहेत. त्यापैकी वासूवर १६ लाख रुपयांचे बक्षीस होते, तर रेश्मावर ४ लाख आणि कमलावर २ लाख रुपयांचे बक्षीस होते. तिघांचे  मृतदेह शवविच्छेदनासाठी गडचिरोली येथील शासकीय सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.

सुरक्षा दलांनी घटनास्थळावरून एक एके-४७ रायफल, एक कार्बाइन, एक इन्सास रायफल आणि नक्षली साहित्यासह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे. 

यापूर्वी १९ मार्च रोजी गडचिरोली जिल्ह्यातील रेपनपल्ली जवळ पोलिसांशी झालेल्या चकमकीत ३६ लाख रुपयांचे बक्षीस असलेले चार संशयित माओवादी ठार झाले होते.

छत्तीसगडमध्ये  चकमकीत ७ नक्षलवादी ठार -

छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यातील जंगलात गुरुवारी (२३ मे)  सुरक्षा दल आणि नारायणपूर, बस्तर आणि दंतेवाडा येथील पोलिस दलाने सुरू केलेल्या संयुक्त कारवाईत ७ नक्षलवादी ठार झाले. घटनास्थळावरून पोलिसांनी ७ शस्त्रे आणि इतर नक्षली साहित्य जप्त केले

नारायणपूर पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, विजापूर आणि नारायणपूर जिल्ह्याच्या सीमेवरील जंगलात सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास चकमक सुरू झाली. बस्तर, नारायणपूर आणि दंतेवाडा येथील सुमारे १ हजार सुरक्षा रक्षक या मोहिमेत गुंतले होते.

सीपीआय (माओवादी) च्या प्लाटून क्रमांक १६ मधील माओवादी नेते आणि इंद्रावती एरिया कमिटीच्या सदस्यांच्या गुप्त माहितीनंतर नारायणपूर, बस्तर आणि दंतेवाडा येथील जिल्हा राखीव दल (डीआरजी) आणि स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) यांचे संयुक्त पथक बुधवारी रात्री नक्षलविरोधी मोहिमेवर रवाना झाले. गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास गोळीबार सुरू झाला. गोळीबार थांबल्यानंतर नारायणपूर पोलिसांनी दोन माओवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले.

टी-२० वर्ल्डकप २०२४