Delhi Rain: दिल्लीतील आयएएस कोचिंग सेंटरमध्ये पाणी शिरल्याने तिघांचा मृत्यू
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Delhi Rain: दिल्लीतील आयएएस कोचिंग सेंटरमध्ये पाणी शिरल्याने तिघांचा मृत्यू

Delhi Rain: दिल्लीतील आयएएस कोचिंग सेंटरमध्ये पाणी शिरल्याने तिघांचा मृत्यू

Updated Jul 28, 2024 07:26 AM IST

Delhi IAS coaching centre News: दिल्लीतील जुने राजेंद्र नगर येथील एका कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये अडकून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. तर, दोन ते तीन विद्यार्थी अडकल्याची भीती पोलिस आणि दिल्ली अग्निशमन दलाने व्यक्त केली आहे.

दिल्लीत मुसळधार पाऊस, आयएएस कोचिंग सेंटरमध्ये पाणी शिरल्याने तिघांचा मृत्यू
दिल्लीत मुसळधार पाऊस, आयएएस कोचिंग सेंटरमध्ये पाणी शिरल्याने तिघांचा मृत्यू

Delhi Rain: दिल्लीतील जुना राजेंद्र नगर येथील सिव्हिल सर्व्हिसेस कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये पाणी शिरल्याने तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून बेसमेंटमध्ये आणखी लोक अडकल्याची भीती अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. दिल्ली अग्निशमन दल, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, दिल्ली पोलिस आणि नागरी यंत्रणांचे कर्मचारी बचावकार्यात गुंतले होते. शनिवारी रात्री उशिरा तिघांचे मृतदेह सापडले, ज्यांची ओळख आणि वय अद्याप समजू शकलेले नाही.

दिल्ली अग्निशमन दलाचे प्रमुख अतुल गर्ग यांनी सांगितले की, अग्निशमन नियंत्रण कक्षाला सायंकाळी सात वाजता या घटनेची माहिती मिळाली. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. बेसमेंटमध्ये पाणी साचल्याने आणि संस्थेबाहेरील रस्ताही पाण्याखाली गेल्याने पाणी साफ करणे अवघड झाले होते. संस्थेच्या मालकाने आम्हाला तीन ते चार विद्यार्थी बेपत्ता असल्याची माहिती दिली एनडीआरएफ आणि इतर यंत्रणांची पथकेही बचावकार्यात सहभागी झाली आहेत, असे गर्ग यांनी सांगितले. बेसमेंटमधील संपूर्ण पाणी बाहेर काढल्यानंतरच पूरग्रस्त बेसमेंटमध्ये आणखी विद्यार्थी अडकले आहेत की नाही याची खात्री होऊ शकेल, असेही त्यांनी सांगितले.

दिल्लीच्या मंत्री आतिशी यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. शनिवारी सायंकाळी लिहिलेल्या पत्रात त्यांनी मुख्य सचिवांना मॅजिस्ट्रेट चौकशी करून २४ तासांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. 'दिल्लीत संध्याकाळी मुसळधार पावसामुळे अपघात झाल्याची बातमी आहे. राजेंद्र नगर येथील कोचिंग इन्स्टिट्यूटच्या बेसमेंटमध्ये पाणी भरले. दिल्ली अग्निशमन दल आणि एनडीआरएफ घटनास्थळी दाखल झाले आहेत. दिल्लीचे महापौर आणि स्थानिक आमदारही तिथे आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दंडाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या घटनेला जो कोणी जबाबदार असेल त्याला सोडले जाणार नाही,' असे आतिशी यांनी 'एक्स'वर पोस्ट केले आहे.

महापौर शेली ओबेरॉय म्हणाल्या, आमदार दुर्गेश पाठक आणि मी तात्काळ घटनास्थळी पोहोचलो. अचानक एक नाला फुटला, ज्यामुळे ही घटना घडल्याचे दिसत आहे. आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत. आम्ही सर्वांना आश्वासन देतो की, याला जो कोणी जबाबदार असेल, मग तो एमसीडी असला तरी कारवाई केली जाईल.'

दरम्यान, खासदार बांसुरी स्वराज यांच्यासमवेत घटनास्थळी उपस्थित असलेले दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा म्हणाले की, ही घटना नाल्यांची साफसफाई न केल्यामुळे झालेल्या निष्काळजीपणाचे स्पष्ट उदाहरण आहे. नाल्याचे पाणी अत्यंत वेगाने कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये शिरले आहे,' असे सचदेवा यांनी सांगितले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर