Business Tips: भारतात गेल्या अनेक दिवसांपासून वर्क लाईफ बॅलन्स बाबत बरीच चर्चा होत आहे. आयुष्यात पुढे जायचे असेल तर, आठवड्यातून किमान ७० तास काम केले पाहिजे, असे अनेक मोठे उद्योगपतींचे म्हणणे आहे. मात्र, कामाचा अतिरिक्त ताण शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम करू शकतो, असे मत आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केले. यामुळे नोकरी करणाऱ्या प्रत्येकाने कामासह आपल्या वैयक्तिक आयु्ष्यही जगले पाहिजे. अशातच २४ वर्षीय उद्योजकाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे, जो आठवड्यातून फक्त ३० तास काम करतो आणि त्याचे वार्षिक उत्पन्न दोन कोटींपेक्षा जास्त आहे.
स्टीव्हन गुओ असे या तरुण उद्योजकाचे नाव आहे, ज्याची कथा प्रेरणादायी आणि खूपच मनोरंजक आहे, जो वर्क लाईफ बॅलन्स आणि स्मार्ट वर्कचे महत्त्व दर्शवते. गुओ याने सिद्ध केले आहे की, फक्त दिर्घकाळ काम करूनच नाही तर, योग धोरणांचा अवलंब करून अधिक पैसा कमावता यतो.
कॅलिफोर्नियातील गुओ यांनी सीएनबीसी मेक इटला दिलेल्या माहितीनुसार, त्याने चांगल्या नोकरीसाठी अमेरिका सोडला आणि इंडोनेशियातील बाली येथे गेला. बाली हे खरोखरच अप्रतिम ठिकाण आहे. वर्क लाईफ बॅलन्स म्हणजे काय आहे? हे इथे समजते. तो सकाळी आपला व्यवसाय चालवतो आणि त्यानंतर दुपारी नवीन गोष्टी शोधण्यात आणि बालीच्या संस्कृतीचा आनंद घेण्यासाठी वेळ घालवतो.
गुओने सांगितले की, त्याने वयाच्या १२ व्या वर्षी व्हिडिओ गेम प्लेअर म्हणून आपला पहिला व्यवसाय सुरू केला.काही महिन्यांतच त्याने १० हजार डॉलर्सचा व्यवसाय केला. यानंतर त्याने गेम डेव्हलपमेंट कंपनी सुरू करण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो अपयशी ठरला आणि सर्व पैसे गमावले. यातून धडा घेत त्याने मार्केटिंगचे महत्त्व समजून घेतले. मग कॅलिफोर्निया विद्यापीठातून बिझनेस इकॉनॉमिक्सचे शिक्षण पूर्ण केले. मात्र कमी गुणांमुळे त्यांनी नोकरीऐवजी व्यवसायाचा मार्ग निवडला. सध्या गुओ हे अमेरिका, यूके आणि फिलीपिन्समध्ये १९ लोकांची कंपनी चालवतात, हे ऐकल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
गुओ आपला सुमारे ४० टक्के वेळ ग्राहक आणि उत्पादनांसाठी विपणन धोरणांवर खर्च करतो. त्याच्या यशस्वी व्यवसायांपैकी एक ऑनलाइन रिटेलर आहे, जो ग्राहकांना खजूर विकतो. त्याचवेळी, दुसरी कंपनी लक्झरी कारसाठी कव्हर्स विकते. गुओला जग फिरण्याचीही आवड आहे. बालीमध्ये स्थायिक होण्यापूर्वी त्यांनी १५ देशांचा प्रवास केला होता.