मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  सोलापुरातील २० गावांचा कर्नाटकात सामील होण्याचा निर्णय; महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणखी पेटणार

सोलापुरातील २० गावांचा कर्नाटकात सामील होण्याचा निर्णय; महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणखी पेटणार

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Nov 30, 2022 01:33 PM IST

maharashtra-karnataka border dispute : सांगली जिल्ह्यातील काही गावांनी कर्नाटकात सामील होण्यासाठी ठराव केला होता. त्यानंतर आता सोलापूर जिल्ह्यातील २० गावांनी कर्नाटकात सामील होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे.

maharashtra-karnataka border dispute
maharashtra-karnataka border dispute (HT)

maharashtra-karnataka border dispute : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील अक्कलकोट, जत आणि सोलापुरावर दावा ठोकल्यानंतर दोम्ही राज्यातील सीमावादाच्या प्रश्नावरून राजकारण पेटलेलं आहे. सीमावादाची कायदेशीर लढाई जिंकण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई आज दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यातच आता सोलापूर जिल्ह्यातील तब्बल २० गावांनी कर्नाटकात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं आता यावरून राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर या दोन तालुक्यातील २० गावांनी विकासकामं होत नसल्याच्या मुद्द्यावरून कर्नाटकात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. या भागातील लोक गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र सरकारकडे रस्ते, पाणी, वीज आणि बससेवेची मागणी करत आहेत. परंतु महाराष्ट्र सरकारच्या दुर्लक्षामुळं गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळं आता आधी सांगली जिल्ह्यातील काही गावांनी कर्नाटकात सामील होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता सोलापूर जिल्ह्यातील तब्बल २० गावांनी विकासकामांसाठी कर्नाटकात सामील होण्याचा निर्णय घेतल्यानं शिंदे-फडणवीस सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर या तालुक्यातील गावांनी सभा घेतली. त्यात बोम्मई सरकारचा विजय असो, कर्नाटकचा विजय असो अशा आशयाच्या घोषणाही देण्यात आल्या आहेत. कर्नाटकातील बेळगाव, कारावार, निपाणी, भालकी आणि बिदर या मराठीभाषिक प्रांताचा महाराष्ट्रात समावेश व्हावा, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र सरकार कायदेशीर लढा देत आहे. परंतु आता कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील तीन शहरांवर दावा ठोकला आहे. परंतु या विषयावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अद्यापही कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळं विरोधकांकडून भाजप आणि शिंदे गटावर टीका केली जात आहे.

IPL_Entry_Point