Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील सीवूड्स येथील डी.पी.एस शाळेच्या पाठीमागे असलेल्या तलावात बुधवारी संध्याकाळी १९ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ माजली. एनआरआय कोस्टल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. मृत तरुणीच्या प्रियकराने तिची हत्या करून तलावात उडी मारल्याचा पोलिसांना संशय आहे. तरुणीचा मृतदेह सापडला असून तरुण अद्याप बेपत्ता आहे.
भाविका मोरे (वय १९) असे मृत तरुणीचे नाव आहे. ती कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थिनी आहे. तर, स्वस्तिक पाटील (वय २०, रा. पनवेल) असे या तरुणीचे नाव असून तो मेडिकल स्टोअरमध्ये कामाला होता. दोघेही दुचाकीवरून घटनास्थळी आल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोघे रिलेशनशिपमध्ये होते आणि घटनास्थळी पोहचल्यानंतर त्यांच्यात काही मतभेद झाले आणि भांडणाला सुरुवात झाली. यानंतर तरुणाने प्रेयसीचा गळा आवळून हत्या केली असावी आणि त्यानंतर स्वत:ही तलावात उडी मारली, अशी माहिती याप्रकरणाची चौकशी करणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.
मुलीचा मृतदेह प्रथम स्थानिक मच्छिमाराला आढळून आला. यानंतर मच्छिमाराने त्वरीत पोलिसांना या घटनेची माहिती दिली. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही तपासले असता मृत तरुणी एका तरुणासोबत दुचाकीवरून आल्याचे दिसून आले. मुलाचा मृतदेह अद्याप सापडलेला नसून शोधमोहीम सुरू आहे, अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली. या गुन्ह्यामागचे कारण अद्याप समजू शकले नसले तरी पोलिसांनी कुटुंबीयांना माहिती दिली. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
नवी मुंबईतील न्हावा गावात एका तरुणाने २४ वर्षीय तरुणीवर लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना उघडकीस घडली. मैत्रिणीसमोर खिल्ली उडवत असल्याचा संशयातून तरुणाने तिच्यावर हल्ला केल्याची सांगितले जात आहे. तरुणीला वेळीच रुग्णालयात नेण्यात आल्याने तिच्या डोक्याला सहा टाके पडले आणि सध्या ती धोक्याबाहेर आहे. प्रीतम म्हात्रे (वय, ३१) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो ट्रेलर चालवतो आणि न्हावा गावात पीडितेच्या परिसरात राहतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी त्याने महिलेवर प्रेम असल्याचे सांगितले होते. मात्र, तिने हा प्रस्ताव फेटाळून लावला. काही दिवसांपूर्वी पीडित तरुणी आपल्या एका मैत्रिणीसोबत न्हावा गावातील खाडीकिनारी माणिक टोक येथे एकत्र वेळ घालवत होती. योगायोगाने म्हात्रेही घटनास्थळी पोहचला. पीडित आपल्या मैत्रिणीसोबत जोरजोरात हसत असल्याचे आरोपीने पाहिले. पीडित तरुणी आपली खिल्ली उडवत असल्याचा आरोपीला संशय आला. त्यानंतर आरोपीने शेजारी पडलेला लोखंडी रॉड उचलून तरुणीवर हल्ला केला.