राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त स्मारकासाठी १९९ कोटींचा निधी -मुख्यमंत्री
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त स्मारकासाठी १९९ कोटींचा निधी -मुख्यमंत्री

राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त स्मारकासाठी १९९ कोटींचा निधी -मुख्यमंत्री

Mar 09, 2024 09:34 PM IST

Shahu Maharaj and Ambedkar Memorial : शाहू महाराज व बाबासाहेब आंबेडकर यांचे संयुक्त स्मारक माणगाव येथे उभारण्याचा आपला संकल्प असून त्यासाठी १९९ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त स्मारकासाठी १९९ कोटींचा निधी
राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त स्मारकासाठी १९९ कोटींचा निधी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वास्तव्य करीत असलेली लंडनमधील वास्तू शासनाने आपल्याकडे घेतल्याचा अभिमान आहे, त्याचीच प्रतिकृती माणगाव येथे साकार करण्यात आली आहे. राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ऐतिहासिक माणगाव परिषद येथेच झाली होती. या दोघांचे संयुक्त स्मारक माणगाव येथे उभारण्याचा आपला संकल्प असून त्यासाठी १९९ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

माणगाव येथील माणगाव परिषदेच्या १५ ठरावांच्या शिलालेखाचे उद्घाटन, होलाग्राफिक शो व माणगाव येथे साकारलेल्या लंडन हाऊस प्रतिकृती इमारत लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, छत्रपती शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या माणगाव येथील संयुक्त स्मारकाबरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल मुंबई येथील स्मारकही संपूर्ण जगाला हेवा वाटेल अशा पद्धतीने करणार असल्याचे सांगितले. राजर्षी शाहू महाराज हे एक महान समाज सुधारक होते. शिक्षण आणि नोकरीत बहुजनांना आरक्षण देणारे व शिक्षणासाठी वसतिगृहाची उभारणी करणारे ते पहिले राजे होते. तर बहिष्कृत समाजाला स्वाभिमानाची आणि स्वत:ची जाणीव करुन त्यांचा उद्धार करणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते.  डॉ. आंबेडकरांनी शाहू महाराजांच्या उपस्थितीत जगातील पहिली बहिष्कृत वर्गाची ऐतिहासिक माणगाव परिषद घेतली त्यामुळे ही पावन भूमी आहे. या भूमीला मी वंदन करतो.

माणगाव येथे साकारण्यात आलेला होलोग्राफिक शो पाहताना राजर्षी छत्रपती शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रत्यक्ष आपल्याशी बोलत आहेत असे दुर्मिळ क्षण आपल्याला पाहावयास मिळत आहे, हे आपल्या सर्वांचे भाग्य असल्याचे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, या ठिकाणी राजर्षी शाहू महाराजांचे शब्द लिहीले आहेत की तुम्ही योग्य नेता निवडला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची देशभक्ती, राष्ट्रभक्ती  लोकांच्या मनातील भावना लक्षात घेवून ते हिंदुस्थानचे नेतृत्व करु शकतात. त्यांना राजाश्रय देण्याचे काम राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केले होते, असेही त्यांनी सांगितले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर