Vasai Boy Fall In Drain: वसई पश्चिमेकडील खैरपाडा गावात एका दीड वर्षाच्या मुलाचा मृतदेह नाल्यात तरंगताना आढळल्यानंतर परिसरात खळबळ माजली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. चिमुकल्याचा मृत्यू घराशेजारील उघड्या नाल्यात पडल्याने झाला, असा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. शनिवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
नेहाल नरेंद्र गोरवले असे मृत मुलाचे नाव आहे. नेहाल हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. आई-वडील कामावर असताना आजीच्या देखरेखीखाली घराबाहेर खेळत होता. नेहालची आजी स्वयंपाकघरात जेवणाची तयारी करत असताना तो खेळण्यासाठी घराबाहेर पडला. काही मिनिटांनी त्याची आजी त्याला शोधायला गेली असता तो कुठेच दिसला नाही. त्याचवेळी नाल्याजवळून जाणाऱ्या एका पादचाऱ्याने नेहालचा मृतदेह पाण्यात तरंगताना पाहिला आणि स्थानिकांना याची माहिती दिली.
या घटनेबाबत माहिती मिळताच वसई पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. नेहालच्या अपघाती मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजित आंधळे यांनी दिली. वसई-विरार महापालिकेतर्फे स्वच्छ करण्यात येत असलेल्या नाल्याची पुरेशी बॅरिकेडिंग न केल्याने नेहालचा अपघात झाल्याचे समोर आले आहे.
पुण्यातील गणपती माथा वारजे-माळवाडी परिसरात राहणाऱ्या भाजी विक्रेत्याने किरकोळ वादातून पत्नीच्या अंगावर डिझेल ओतून तिला जिवंत पेटवून दिले. या घटनेत पीडित महिला गंभीर जखमी झाली. तिला जवळच्या रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
पूजा प्रवीण चव्हाण असे मृत महिलेचे नाव आहे. तर, प्रवीण बाबासाहेब चव्हाण (वय २६) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मृत महिलेचा भाऊ अमोल पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३०२ आणि ४९८ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
संबंधित बातम्या