मुंबईमध्ये गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पावसाने लोकांची दैना उडवली असून सर्व नाले ओसंडून वाहत आहेत. या मुसळधार पावसाने वसईत एका १७ वर्षीय मुलाचा बळी गेला आहे. वसई पूर्व येथे नाल्यात बुडून १७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. आर्यन महाडिक (वय १७) असे या मृत मुलाचे नाव आहे. तो नालासोपारा येथे राहणारा आहे.
रविवार व सोमवारी दोन दिवस मुंबई व उपनगरांना मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. वसईतील अनेक सखल भागात पावसाचे पाणी साचले आहे. शहरातील नाले ओसंडून वाहत आहेत. वसई पूर्वेच्या एव्हरशाईन येथील नाल्यात बुडून तरुणाचा मृत्यू झाला. आर्यन महाडिक (१७) वसई पूर्वमधील वसंत नगरी येथे पाणी साचलेल्या रस्त्यावरून आपल्या मित्रासह जात होता. नाल्याच्या कडेने तो चालला होता. नाल्याजवळ संरक्षक भिंत नसल्याने आर्यनचा तोल जाऊन तो नाल्यात पडला. नाल्यात पडल्यानंतर त्याने बाहेर येण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याचा वेग अधिक असल्याने त्याला बाहेर येता आले नाही. अग्निशमन दलाने त्याला बाहेर काढले व तत्काळ रुग्णलयात दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ही घटना सोमवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. आर्यनचा मृतदेह शवविच्छदाासाठी पाठवला आहे.
दोन दिवसाच्या मुसळधार पावसाने मुंबईतील सर्वच भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. ठिकठिकाणी पाणी साचल्याने रस्ते व रेल्वे वाहतुकीचा पार बोजवारा उडाला आहे. भारतीय हवामान खात्याने ९ जुलै रोजी सुद्धा अतिवृष्टी होणार असल्याच्या इशारा दिला आहे.
पावसामुळे लोकल सेवा ठप्प झाली आहे. सकाळपासूंन रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी झाली आहे. ज्या गाड्या सुरू आहेत त्यांना मोठी गर्दी आहे. या गर्दीमुळे पनवेल सीबीडी स्थानकादरम्यान,एक महिला लोकल पकडण्याच्या नादात पाय घसरून रुळावर पडल्याने तिच्या पायावरून लोकल गेल्याने दोन्ही पाय कापले गेले. या महिलेचा जीव वाचला असला तरी तिला कायमचे अपंगत्व आले आहे.
बेलापूर रेल्वे स्टेशन येताना या गाडीतून तिचा पाय घसरल्याने महिला रुळावर पडली. यावेळी या महिलेच्या अंगावरून रेल्वेचा पहिला महिला डब्बा गेला. रेल्वे अधिकाऱ्यांनी तातडीने गाडी मागे घेऊन महिलेला रुग्णालयात भरती केले. या महिलेचे नाव समजू शकले नाही. या महिलेचा जीव वाचला असला तरी तिचे दोन्ही पाय या अपघातात कापले गेल्याने टी अपंग झाली आहे.
संबंधित बातम्या