Karnataka Accident News: कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यात शुक्रवारी पहाटे व्हॅन आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण धडक झाली. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांसह १५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
हावेरीचे पोलिस अधीक्षक अंशु कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास ब्यादगी तालुक्यातील गुंडेनहळ्ळी क्रॉसजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारच्या बाजूला भाविकांना घेऊन जाणारी व्हॅन रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. पीडित महाराष्ट्र आणि कर्नाटकातील तीर्थक्षेत्रांना भेट देत होते. या दुर्घटनेत २३ वर्षीय ड्रायव्हरचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती कुमार यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, व्हॅन चालक हा गेल्या अनेक तासांहून अधिक काळ गाडी चालवत असल्याने अचानक त्याला डुलकी लागली, असे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या अपघातात १३ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, दोघांचा हावेरी शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. व्हॅनच्या तुटलेल्या अवशेषांमध्ये मृतदेह अडकले आहे. अग्निशमन दल आणि पोलिसांना त्यांना बाहेर काढण्यात अडचणी येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
नियमाविरुद्ध महामार्गावर वाहन पार्क केल्याप्रकरणी ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे, असे कुमार यांनी सांगितले. एसपींनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात जखमी झालेल्या २४ वर्षीय अर्पिताने सांगितले की, व्हॅन चालक २४ तासांहून अधिक काळ झोपला नव्हता. यामुळेच हा अपघात झाला असावा, असे ते म्हणाले.
व्हॅन चालकाचा चुलत भाऊ सुमंत याने सांगितले की, आदर्शने पंधरवड्यापूर्वी व्हॅन खरेदी केली होती. त्याचे वडील नागेश आणि आई विशालाक्षी अंगणवाडी सेविका यांनी बँकेचे कर्ज घेऊन नुकतीच व्हॅन खरेदी केली होती. मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत हे कुटुंब तीर्थयात्रेला निघाले होते. या दुर्घटनेत कुटुंबातील तिघांचाही मृत्यू झाला.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. "कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यात बस अपघातात महिला आणि मुलांसह अनेक भाविकांचा मृत्यू झाल्याची बातमी ऐकून दु:ख झाले आहे. मी मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करते आणि जखमींना लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करते." असे त्यांनी म्हटले.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. हावेरी येथे झालेल्या भीषण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना शासनाकडून प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. मृतांच्या आत्म्याला शांती लाभो आणि माझा देव त्यांच्या कुटुंबियांना दु:ख सहन करण्याची शक्ती देवो, अशी मी प्रार्थना करतो. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, खासदार बसवराज बोम्मई आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार विजयेंद्र यांनीही शोकसंतप्त कुटुंबियांचे सांत्वन केले.
संबंधित बातम्या