मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  जेव्हा अतिरेक्यांच्या गोळीबारानं मुंबईतील रस्ते रक्तानं माखले; २६/११ च्या जखमा अजूनही ताज्या

जेव्हा अतिरेक्यांच्या गोळीबारानं मुंबईतील रस्ते रक्तानं माखले; २६/११ च्या जखमा अजूनही ताज्या

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Nov 26, 2022 08:34 AM IST

Terror Attack In Mumbai : पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईचं दागिनं असलेल्या ताज हॉटेलमध्ये तुफान गोळीबार केला. याशिवाय गर्दीच्या ठिकाणी निष्पाप लोकांवर बेछूट हल्ले केले. त्यामुळं कधीही न थांबणारी मुंबई काही दिवसांसाठी थांबली.

Mumbai Terror Attacks
Mumbai Terror Attacks (HT)

Mumbai Terror Attacks : २६ नोव्हेंबर २००८ हा दिवस प्रत्येक मुंबईकर आणि भारतीय नागरिकासाठी काळा दिवस होता. कारण याच दिवशी अरबी समुद्रामार्गे मुंबईत शिरलेल्या दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईवर हल्ला केला. या भ्याड हल्ल्याला आज १४ वर्षे पूर्ण झाली असली तरी मुंबईकरांच्या मनात थरारक प्रसंग, वेदनादायी घटना आणि कटू आठवणी अजूनही कायम आहेत. या अतिरेकी हल्ल्यामुळं भारतानं पाकिस्तानचा खरा अतिरेकी चेहरा जगासमोर आणला. याशिवाय या हल्ल्यात एकमेव जिवंत पकडलेला आरोपी मोहम्मद अजमल आमिर कसाब याला फाशीच्या सुळावर चढवलं.

२६ नोव्हेंबरला दहा पाकिस्तानी अतिरेकी समुद्रामार्गे मुंबईत शिरले. दोन-दोन जणांचं गट करत त्यांनी मुंबईतील सीएसटी, ताज हॉटेल, ऑबेरॉय हॉटेलसह गर्दीच्या ठिकाणांवर निष्पाप लोकांवर गोळीबार हत्या करायला सुरुवात केली. त्यात अनेक परदेशी नागरिकांसह जवळपास १६० लोकांचा मृत्यू झाला होता. अतिरेक्यांनी मुंबईतील हॉटेल्समध्ये गोळीबार करत अनेक हॉटेलमधील कर्मचारी आणि लोकांना वेठीस धरलं होतं. त्यामुळं महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारनं रॅपिड अॅक्शन फोर्स आणि मरिन कमांडोसह नॅशनल सिक्युरिटी गार्डच्या जवानांना मुंबईत तैनात केलं. पुढील ६० तास म्हणजे तीन दिवस सुरक्षा दल आणि अतिरेक्यांमध्ये चकमक सुरू होती. त्यानंतर पोलिसांनी दहापैकी नऊ अतिरेक्यांना ठार केलं. याशिवाय अजमल कसाब हा एकमेव अतिरेकी जिवंत पकडला गेला.

अतिरेकी हल्ल्यात कर्तुत्त्ववान पोलीस शहीद...

मुंबईतील अतिरेकी हल्ल्यात हेमंत करकरे, विजय साळसकर, तुकाराम ओंबळ आणि अशोक कामटे यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी शहीद झाले होते. मायानगरीवर झालेल्या भ्याड हल्ल्यात पोलिसांनी धैर्य दाखवत शहराचं रक्षण करण्यासाठी जीवाची बाजी लावली. त्यामुळं दरवर्षी या पोलीस कर्मचाऱ्या आदरांजली अर्पण केली जाते.

अजमल कसाबला पुण्यात फाशी...

मुंबई हल्ल्यात जिवंत पकडण्यात आलेला एकमेव अतिरेकी अजमल कसाबला मुंबईतील आर्थर रोड जेलमधील अंडासेलमध्ये ठेवण्यात आलं. त्याच्या फाशीची मागणी भारतासह जगभरातून केली जात होती. कसाबनं केलेल्या गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर २०१० साली कोर्टानं दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. त्यानंतर कसाबनं राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला, परंतु राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी हा अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर २१ नोव्हेंबरला २०१२ रोजी महाराष्ट्र सरकारनं अतिरेकी अजमल कसाबला पुण्यातील येरवडा जेलमध्ये फासावर लटकवलं.

IPL_Entry_Point