शाळेच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून आठवीत शिकणाऱ्या १४ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. चिंचवड गावातील हुतात्मा चाफेकर विद्या मंदिरात शुक्रवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने शालेय प्रशासनात एकच खळबळ माजली आहे.
सार्थक कांबळे असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. चिंचवड पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मुलगा शाळेच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर मित्रांसोबत खेळत असताना हा दुर्दैवी अपघात झाला. जिन्याच्या रेलिंगजवळ उभे असताना सार्थक चुकून घसरून पायऱ्यांवरून खाली पडला. यात तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने पालिका रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.
या घटनेच्या तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन शाळा प्रशासनाने दिले आहे. चिंचवड पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शाळा चालविणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेने मृत विद्यार्थ्याच्या पालकांना शासनाच्या मान्यतेने पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने मृत विद्यार्थ्याच्या पालकांना राजीव गांधी विद्यार्थी अपघात अनुदान योजनेंतर्गत १ लाख ५० हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईच्या बोरिवली परिसरात शुक्रवारी धक्कादायक घटना घडली. एका महिलेने अकरा वर्षाच्या मुलीचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. रेखा सोलंकी (वय, ४६) असे आरोपी महिलेचे नाव आहे. तिच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हत्येमागचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली.