Mumbai rape crime : देशात कोलकता येथील ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. ही घटना ताजी असतांना मुंबईत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आई मद्यधुंद असतांना नराधम बापाने आपल्या १३ वर्षांच्या मुलीला धमकावत तिच्यावर अत्याचार केला. तसेच ही बाब कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिली. हा प्रकार पिडीत मुलीने तिच्या मावशीला सांगितल्यावर याचा उलगडा झाला. या प्रकरणी मुलीच्या नराधम वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना मुंबईच्या पश्चिम उपनगरात २७ जुलै रोजी घडली. पिडीत १३ वर्षांची मुलगी ही तिच्या कुटुंबासमवेत राहते. आरोपी वडिलांनी पत्नीला दारू पाजली. अति प्रमाणात दारू प्यायल्याने मुलीची आई ही बेशुद्ध पडली. याचा फायदा घेत नराधम वडील मुलीच्या खोलीत गेले. व तिच्यावर त्यांनी अत्याचार केला. मुलीने विरोध केलाअसता तसेच हा प्रकार कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी आरोपी वडिलांनी मुलीला दिली. या प्रकारामुळे मुलगी गेल्या काही दिवसांपासून दहशतीत होती. मात्र, वडील त्रास देत असल्याने मुलीने हिम्मत करून हा सर्व प्रकार तिच्या मावशीला सांगितला. मुलीवर बेतलेला प्रसंग ऐकून मावशी देखील हादरली. तिने या प्रकाराची माहिती पोलीसांना देत तक्रार दाखल केली. पीडितेनेही या प्रकरणी जबाब दिला व तिच्यासोबत घडलेली सर्व घटना कथन केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी वडिलांविरोधात पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या झालेल्या प्रकारामुळे मुलगी चांगलीच दहशतीत आहे. तिला मानसिक धक्का बसला आहे. घटना घडल्यावर काही दिवस मुलगी मोठ्या धक्क्यात होती. ती कुणाशी बोलत नव्हती. तसेच वडील देखील तिला तिच्या सोबत घडलेला प्रसंग कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देत होते. सतत होणाऱ्या त्रासाला मुलगी कंटाळली होती. एक दिवस तिने तिचे मन मोकळे कारायचे ठरवले व तिने सर्व प्रकार तिच्या मावशीला कथन केला. यानंतर या प्रकाराचा उलगडा झाला. मुलीचे रक्षण करणाऱ्या वडिलांनी हे घृणास्पद कृत्य केल्याने मुलीला धक्का बसला आहे.