मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  शिक्षण व्यवस्थेची लक्तरे! बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला लिहिता, वाचताही येत नाही

शिक्षण व्यवस्थेची लक्तरे! बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला लिहिता, वाचताही येत नाही

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Dec 22, 2022 06:56 PM IST

शैक्षणिक दुरवस्थेचे भीषण वास्तव चव्हाट्यावर आणणारी घटना बुलढाण्यात घडली आहे. बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला लिहिता-वाचताही येत नाही तर तो इथंपर्यंत गेलाच कसा, असा सवाल करत पालकाने शिक्षण मंत्र्यांकडे तक्रार दाखल केली आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

बुलढाणा - शिक्षणाचा मूलभूत उद्देशच असतो की, अक्षरज्ञान असणे. प्राथमिक शिक्षण घेणाऱ्याला किमान लिहिता-वाचता येणे अपेक्षित असते. मात्र शिक्षण व्यवस्थेची लक्तरे पार वेशीवर टांगणारा प्रकार महाराष्ट्रातील बुलढाण्यात समोर आला आहे. आपल्या पाल्याला अक्षर ज्ञानच नाही, त्याला लिहिता-वाचताही येत नाही मग तो बारावी पर्यंत पोहचलाच कसा? असा सवाल करत एका पालकानेच चक्क शिक्षणमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. या घटनेने राज्याच्या शिक्षण क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे.

हा धक्कादायक प्रकार घडला आहे, बुलढाण्यातील मलकापूर शहरातील झकारिया आघाडी उर्दू ज्युनिअर कॉलेजमध्ये. येथे बारावीत शिकणाऱ्या फैजान या विद्यार्थ्याला लिहिता-वाचताही येत नाही. पाचवीपासून हा विद्यार्थी या शाळेत उर्दू माध्यमातून शिकत असून आता तो बारावीच्या वर्गात आहे. विशेष म्हणजे याला दहावीत चक्क ७१ टक्के गुण मिळाले आहेत. त्यानंतर अकरावीतही या विद्यार्थ्याने ७१ टक्के गुण मिळवले. लिहिता वाचता न येताही हे कसे शक्य झाले असा सवाल आता उपस्थित होत आहे.

या विद्यार्थ्याला गुणपत्रिका व परीक्षा प्रवेश पत्र यातील फरकही समजत नाही. परीक्षेवेळी शिक्षक फळ्यावर उत्तरे लिहायचे ते आम्ही लिहायचो असे म्हणतो. त्याचबरोबर जे विद्यार्थी परीक्षेला बसले नव्हते तेही पास झाल्याचे तो म्हणाला.

आताच हा प्रकार कसा उघडकीस आला तर, एक दिवस काही विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ कारणांवरून हाणामारी झाली. त्यावेळी मुख्याध्यापकांनी या विद्यार्थ्यांना आपल्या पालकांना शाळेत घेऊन येण्यास सांगितले. त्यावेळी फैजानचे पालकही शाळेत आहे. त्यावेळी शिक्षकांनी तुमच्या पाल्याला काहीच येत नसल्याने शाळेतून काढत असल्याचे सांगितले. घरी गेल्यावर फैजानच्या पालकांनी शहानिशा केली तर त्यांना धक्का बसला त्याला काहीच लिहिता, वाचता येत नव्हते.

माझ्या मुलाला लिहिता वाचता येत नसल्यावरही तो बारावीत पोहचलाच कसा...? मुलाचं आयुष्य उद्धवस्त करणाऱ्या गुणवत्ता नसलेल्या शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी पालकाने थेट शिक्षणमंत्री आणि जिल्हाधिकारी तसेच शिक्षणाधिकारी यांच्याकडे केल्याने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या