Malegaon Leopard news : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील मालेगाव शहरात घडलेल्या एका प्रसंगाचा व्हिडिओ सध्या देशभर व्हायरल झाला आहे. १२ वर्षांच्या चिमुकल्याचा हा व्हिडिओ आहे. एका खतरनाक बिबट्याला या चिमुरड्यानं कसं हिंमतीनं घरात जेरबंद केलं ते या व्हिडिओमध्ये दिसत आहे. या चिमुरड्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.
मागील काही दिवसांपासून मालेगाव शहरात बिबट्याचा संचार असल्यानं काहीसं भीतीचं वातावरण आहे. याच वातावरणात ही घटना घडली आहे. मालेगाव शहरात घुसलेला एक बिबट्या दरवाजा उघडा असलेला पाहून नामपूर रोडवरील एका लॉन्सच्या खोलीत शिरला. मोहित विजय आहिरे नावाचा १२ वर्षांचा लहान मुलगा त्यावेळी घरात होता. तो मोबाइलवर गेम खेळत होता.
बिबट्या घरात शिरून थेट आतल्या खोलीत गेला. मुलावर त्याची नजर पडली नाही. मात्र, त्या चिमुकल्यानं बिबट्याला पाहिलं. अशा वेळी एखादा माणूस गर्भगळीत झाला असता. पण चिमुकला मोहित अजिबात विचलित झाला नाही. धोका त्याच्या लगेचच लक्षात आला. बिबट्या आत गेल्याचं पाहून तो हळूच उठला आणि घराबाहेर जाऊन दरवाजा बाहेरून लॉक केला. हा सर्व घटनाक्रम घरातील आणि घराबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
बिबट्या आतमध्ये असल्याची माहिती नंतर सर्व संबंधित यंत्रणांना देण्यात आली. त्यानंतर बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी वनविभाग, पोलीस विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी काही वेळातच बिबट्याला बेशुद्धीचं इंजेक्शन देऊन जेरबंद केलं. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, निफाड, इगतपुरी, मालेगाव, चांदवड, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्ये सध्या बिबट्याची चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. या तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी, दारणा आणि कादवा या नद्यांच्या काठाला ऊसाचं मोठं क्षेत्र आहे. लपण्यासाठी व प्रजननासाठी बिबटे या शेतांचा आधार घेत आहेत. तसंच, शेळ्या, मेंढ्या आणि कुत्रे भक्ष्य म्हणून मिळत असल्यानं बिबट्यांचा वावर इथं वाढला आहे.
बिबट्या व अन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी वन विभागानं नागरिकांना काही सूचना केल्या आहेत. ऊसतोड सुरू असल्यास बाजूला शेकोटी पेटती ठेवावी. त्यामुळं रानटी प्राणी जवळ येणार नाहीत. विशेषत: लहान मुलांवर बिबटे हल्ला करत असल्यामुळं पालकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन वन विभागानं केलंय.