मुंबईतील गोरेगावमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. चिकन शोर्मा खाल्ल्याने १२ जणांना विषबाधा झाली आहे. विषबाधा झालेल्यांना (food poisoning ) रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना गोरेगाव पूर्वमधील संतोषनगरमध्ये घडली आहे.
गोरेगावमधील एम डब्ल्यू देसाई रुग्णालयात विषबाधितांवर उपचार केले जात आहेत. यातील नऊ जणांना प्राथमिक उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ३ जणांवर अजूनही उपचार सुरू आहेत. स्वप्निल डहाणूकर, मुस्ताक अहमद आणि सुजित जयस्वाल या तिघांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव पूर्व येथील संतोष नगरमधील चिकन शोर्मा खाल्ल्याने १२ जणांना विषबाधा झाली. या सर्वांनी गोल्डन बार समोर सॅटॅलाइट टॉवर येथे चिकन शर्मा खाल्ला होता. सर्व १२ जणांना गोरेगाव परिसरातील एम डब्ल्यू देसाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. यातील तिघांची प्रकृती गंभीर आहे.
शुक्रवारी (२६ एप्रिल) या दिवशी १० जणांना विषबाधा झाली होती. त्यानंतर शनिवारी (२७ एप्रिल) आणखी दोघांना उलट्या व मळमळीचा त्रास जाणवू लागला. त्यानंतर त्यांनाही रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर त्यातील ९ जणांना घरी सोडण्यात आले असून अजूनही तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा जवळील माजरी येथे एका धार्मिक कार्यक्रमात महाप्रसादातुंन १२५ जणांना विषबाधा झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर काही जणांची प्रकृती ही गंभीर आहे. विषबाधा झालेल्यामध्ये ६ पुरुष, ३० महिला व २४ लहान मुलांचा समावेश असून त्यांच्यावर जवळील रुग्णालयात भरती करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. दरम्यान, या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. ही घटना १४ एप्रिल रोजी घडली होती.चंद्रपूर जिल्ह्यातील माजरी येथील कालीमाता मंदिरात शनिवारी (दि १३) रात्री महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. येथील धार्मिक कार्यक्रमात आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक माजरी येथे आले होते.