शिवाजी महाराजांच्या काळातील गडकिल्ले महाराष्ट्रांच्या संस्कृतीचे वैभव आहेत. या गडकिल्ल्यांचा केंद्र सरकारकडून अनोख्या पद्धतीने गौरव करण्यात आला आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या २०२४-२५ साठीच्या यादीसाठी केंद्र सरकारकडून शिवरायांच्या १२ किल्ल्यांना नामांकन देण्यात आले आहे. मराठा साम्राज्याच्या काळात ज्या १२ किल्ल्यांचा लष्करी तळासाठी वापर केला, त्या किल्ल्यांना आता युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत स्थान देण्यासाठी भारत सरकारकडून नामांकन मिळाले आहे. यामध्ये शिवनेरी, लोहगड, रायगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, साल्हेर, राजगड, खंडेरी, प्रतापगड आणि तमिळनाडूमधील जिंजी किल्ल्यांची निवड करण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, गेल्या४०० वर्षानंतरही शिवकालीनगड किल्ले मजबूत स्थितीत आहेत. दरवर्षी लाखो शिवप्रेमी या किल्ल्यांवर जात असतात. त्यात आता छत्रपती शिवरायांच्या राज्यातील ११ व तामिळनाडूतील एक किल्ल्याला जागतिक वारसा स्थळाच्या यादीत नामांकन मिळाले आहे. या किल्ल्यांना असलेला शौर्य, पराक्रम, रयतेच्या कल्याणाचा वारसा आणि ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता त्यावर अंतिम मोहोरही उमटेल, असा विश्वास आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करूनमाहिती दिली की, हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या आणि रयतेच्या कल्याणासाठी झटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनीभक्कम गड किल्ल्यांची बांधणी करून सक्षम राज्य निर्माण केले. हे गडकिल्ले स्वराज्याची शान आणि महाराष्ट्राच्या समृद्धीचे द्योतक आहेत. गेली अनेक शतके ताठ मानेने उभे असलेल्या या गड किल्ल्यांवर ऐतिहासिक वारशाची मोहोर उमटवण्याचा प्रयत्न सुरू आहेत.
प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने दिलेल्या माहितीनुसार,१७ व्या आणि १९ व्या शतकात मराठा शासन काळात या किल्ल्यांचा वापर करून राज्यकर्त्यांनी अतुलनीय पराक्रम गाजविला. सह्याद्री, कोकण किनारपट्टी आणि दख्खनच्या पठारावर असलेल्या या किल्ल्यांचे भौगोलिक, सांस्कृतिक असे महत्त्व आहे. महाराष्ट्रात एकूण ३९० छोटे-मोठे किल्ले आहेत. त्यापैकी युनेस्कोच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी १२ किल्ल्यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाकडून १२ पैकी आठ किल्ल्यांचे याआधीच संवर्धन करण्यात आलेले आहे.
भारतातील ४२ ठिकाणांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेश करण्यात आलेला आहे. यापैकी सहा ठिकाणे महाराष्ट्रातील आहेत.
संबंधित बातम्या