मुंबई- अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने शिवसेनेकडून ११ कोटींची देणगी देण्यात आली आहे. शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते ११ कोटी रुपयांचा धनादेश राम जन्मभूमी न्यासाचे सरचिटणीस चंपत राय यांच्याकडे शनिवारी (६ जानेवारी) रोजी सुपूर्द करण्यात आला.यावेळी राज्याचे उद्योग मंत्री उदयजी सामंत, शिवसेनेचे राज्य समन्वयक आणि प्रवक्ते नरेश म्हस्के, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी आणि राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे पदाधिकारी उपस्थित होते.
खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेनेच्या शिष्टमंडळाने अयोध्येला जाऊन चंपत राय यांची भेट घेतली आणि पक्षाच्या वतीने हा धनादेश त्यांच्याकडे सुपूर्द केला. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले, आज संपूर्ण महाराष्ट्राच्या, महाराष्ट्रातील नागरिकांच्या, शिवसैनिकांच्या आणि शिवसेनेच्या वतीने श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला ११ कोटी रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे. अयोध्येत राम मंदिर व्हावे हे स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. ते कायम म्हणायचे की जर मी पंतप्रधान झालो तर काश्मिरातून कलम ३७० हटवेन आणि अयोध्येत प्रभु श्रीरामाचे मंदिर उभारण्याचे काम करेन. स्वर्गीय बाळासाहेबांचे तेच स्वप्न आता पूर्ण होते आहे.
श्रीराम मंदिराचे स्वप्न अनेक पिढ्यांनी पाहिले. हे स्वप्न आता पूर्ण होत असून हा प्रत्येक भारतीयांसाठी आनंदाचा, अभिमानाचा आणि उत्साहाचा क्षण आहे. आताच्या पिढीला आणि भविष्यातल्या अनेक पिढ्यांना प्रभू श्रीरामाचे दर्शन अयोध्येतील या मंदिरात करता येणार असल्याचे शिंदे म्हणाले.
अयोध्या येथे प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर उभे राहत आहे. या मंदिर उभारणीच्या संघर्षात आजवर अनेक कारसेवकांचे,शिवसैनिकांचे आणि रामभक्तांचे योगदान लाभले आहे. येत्या २२ तारखेला या मंदिराचे भव्य दिव्य स्वरूपात उद्घाटन पार पडणार आहे.