Marathwada Farmers Suicide : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येच सत्र सुरूच असून या संदर्भात हादरवून टाकणारी माहिती समोर आली आहे. ‘२०२३ मध्ये मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये १,०८८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत,’ अशी माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अहवालातून समोर आली आहे.
यापूर्वीच्या, म्हणजेच २०२२ या वर्षाच्या तुलनेत हा आकडा ६५ ने वाढला आहे, असं एका अधिकाऱ्यानं सांगितल्याचं वृत्त 'एनडीटीव्ही'नं दिलं आहे. २०२३ मध्ये झालेल्या १०८८ आत्महत्यांपैकी बीडमध्ये सर्वाधिक २६९ आत्महत्या झाल्या. त्याखालोखाल छत्रपती संभाजीनगरमध्ये १८२, नांदेडमध्ये १७५, धाराशिवमध्ये १७१ आणि परभणीमध्ये १०३ आत्महत्या झाल्या, असं अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
जालना, लातूर आणि हिंगोली या जिल्ह्यांत अनुक्रमे ७४, ७२ आणि ४२ मृत्यूंची नोंद झाली आहे. अहवालानुसार, मराठवाड्यात २०२२ मध्ये १,०२३ शेतकरी आत्महत्या झाल्या, ज्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, धाराशिव, लातूर, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांचा समावेश आहे.
प्रशासनानं प्रत्येक प्रकरणाची चौकशी केली आणि पात्र प्रकरणांमध्ये कुटुंबाला १ लाख रुपयांची भरपाई देण्यात आली, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यानं दिली.
आत्महत्या झालेल्या १०८८ प्रकरणांपैकी ७७७ नुकसान भरपाईसाठी पात्र होते. या सर्वांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली आहे. तर, १५१ प्रकरणांची चौकशी सुरू आहे, असंही त्यानं सांगितलं.
संबंधित बातम्या