Badlapur Sexual Assault : बदलापूरच्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुलींच्या मदतीसाठी सरकारने उचललं मोठं पाऊल-10 lakh aid to badlapur family further education responsibility of education said deepak kesarkar ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Badlapur Sexual Assault : बदलापूरच्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुलींच्या मदतीसाठी सरकारने उचललं मोठं पाऊल

Badlapur Sexual Assault : बदलापूरच्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुलींच्या मदतीसाठी सरकारने उचललं मोठं पाऊल

Aug 26, 2024 06:54 PM IST

Badlapur sexual assault case : शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी म्हटले की, अत्याचार झालेल्या मुलीला १० लाख रुपये आणि अत्याचाराचा प्रयत्न झालेल्या मुलीच्या कुटूंबाला ३ लाख रुपयांची मदत दिली जाईल. दोघींच्या शिक्षणाचा खर्च सरकार करणार आहे.

शाळेच्या गेटवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
शाळेच्या गेटवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

बदलापूर येथील शाळेत घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठे पाऊल उचलत सोमवारी पीडित मुलींच्या कुटूंबाला १० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. महिला व बालविकास विभागामार्फत मुलीच्या कुटुंबाला ही मदत दिली जाणार आहे. त्याचबरोबरसरकारने अन्य एका चार वर्षांच्या मुलीच्या कुटुंबासाठी ३लाख रुपयांची मदत दिली आहे. त्याचबरोबर दोन्ही मुलींना पदवीपर्यंतचे शिक्षण देण्याची जबाबदारी शिक्षण विभागाने घेतली असल्याची घोषणा शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी केली आहे.

बदलापूर प्रकरणाच्या चौकशीसाठी शालेय शिक्षण विभागाने एक चौकशी समिती नेमली होती. या चौकशी समितीचा अहवाल समोर आला असून शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज हा अहवाल वाचून दाखवला.या घटनेच्या चौकशीत काही पोलीस अधिकारी दोषी आढळल्यानंतर त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना आठवले यांना निलंबित करण्यात आले आहे,तपासादरम्यान त्यांनी काही माहिती लपविल्याचे निष्पन्न झाले आहे.

दीपक केसरकर म्हणाले,  ज्या ठिकाणी ही घटना घडली त्याठिकाणचे १५ दिवसांचं सीसीटीव्ही फुटेज गायब आहे. कामिनी काळेकर व निर्मला भुरे या सेविकांवर मुलींना स्वच्छतागृहात नेण्याची व तिथून आणण्याची जबाबदारी होती. मात्र त्या त्यांच्या कामावर हजर नसल्यामुळे हा प्रकार घडला. त्यामुळे या दोन सेविकांना सहआरोपी करण्याची शिफारस चौकशी अहवालाद्वारे करण्यात आली आहे. या मुलींच्या वर्गशिक्षिका व मुख्याध्यापिकेनेही याप्रकरणी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. तसेच त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली नाही. त्यामुळे त्यांनाही सहआरोपी म्हणून उभं करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

मुलींची वर्गशिक्षिका, शाळेची मुख्याध्यापिका व संस्थेतील पदाधिकाऱ्यांना या प्रकरणाची माहिती असूनही त्यांनी याप्रकरणी कोणतीही कारवाई केली नाही, तसेच त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली नाही. त्यामुळे त्यांच्यावर पॉक्सो कायद्याच्या कलम १९ व कलम २१ अंतर्गत गुन्हा दाखल केला जाणार आहे.

या लैंगिक अत्याचार प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल. राज्यातील शाळांच्या सुरक्षेसाठी आणि मुलांच्या सुरक्षेसाठी सरकारकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये सीसीटीव्ही बसवणे, १५ दिवसांचे रेकॉर्ड सुरक्षित ठेवणे आदींचा समावेश आहे. शाळांमध्ये स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्याची प्रक्रिया ५० टक्के पूर्ण झाली असून लवकरच सर्वसमावेशक शासन आदेश जारी केला जाईल. सीसीटीव्हीसोबतच प्रत्येक शाळेत पॅनिक बटण बसवण्याचा गृह विभागाला प्रस्ताव देण्यात येणार आहे.

पीडित मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी सरकार घेणार - केसरकर

दीपक केसरकर यांनी सांगितलं की, लवकरच ते पीडित मुलींची भेट घेणार आहेत. तसेच केसरकरांनी दोन्ही मुलींच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याची तयारी दर्शवली आहे.

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून पालकांनी आक्रोश व्यक्त केला आहे. संपूर्ण देशभरात हे प्रकरण गाजल्याने न्यायालय परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शिवाय आरोपी अक्षय शिंदे यालाही मोठ्या पोलिस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यातच, कोर्टाच्या आदेशानुसार अक्षय शिंदेची रवानगी आधारवाडी कारागृहात करण्यात येणार आहे. अक्षय शिंदेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यापूर्वी त्याला २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.