पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शिवाजी महाराजांचे विचार भाजपच पुढे नेत आहे, उदयनराजेंचा भाजपत प्रवेश

उदयनराजे भोसले यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सध्या भाजपच पुढे नेत आहे, असे शिवाजी महाराजांचे वंशज आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी सांगितले. उदयनराजे भोसले यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. राजीनामा देण्यापूर्वी उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी रात्री उशीरा आपल्या लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे दिला. 

अमित शहा यांच्या शासकीय निवासस्थानी पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी आपली भूमिका मांडताना उदयनराजे म्हणाले, शिवाजी महाराजांनी सर्वधर्मसमभावाची शिकवण दिली. भारताची लोकशाही शिवाजी महाराजांच्या शिकवणीवरच आधारित आहे. गेल्या काही वर्षांत लोकशाही मजबूत करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहांच्या नेतृत्त्वात झाले आहे. शिवाजी महाराजांच्या विचारांना घेऊनच भाजप पुढे जात आहे. प्रत्येक राज्यात भाजपची जी प्रगती होते आहे. अनेकांना या पक्षात यायचे आहे. त्याचे हेच कारण आहे, असे त्यांनी सांगितले. 

मी लहानपणापासून काश्मिरच्या प्रश्नाबद्दल ऐकतो आहे. पण या प्रश्नाकडे कुणी गांभीर्याने बघितले नाही. काश्मीरसंदर्भात सरकारने घेतलेले निर्णय योग्य आहेत. त्यामुळेच मी तीन महिन्यात खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये आलो आहे, असेही उदयनराजे यांनी यावेळी सांगितले.

राजे आल्यामुळे भाजपला मोठी ताकद मिळाली असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. राजे भाजपत आल्याचा पक्षाबरोबरच समाजालाही फायदा होईल, असेही त्यांनी सांगितले. 

अमित शहा यांनीही उदयनराजे पक्षात आल्याचा आम्हाला फायदा होईल, असे सांगत त्यांच्या प्रवेशाचे स्वागत केले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Udayanraje Bhosale descendant of Shivaji Maharaj joins BJP in presence of BJP President Amit Shah and Maharashtra CM Devendra Fadnavis