पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आमची फाईल कायम डस्टबीनमध्येच जायची, उदयनराजेंची राष्ट्रवादीवर टीका

उदयनराजे भोसले

आमचा पक्ष सत्तेत असताना जी कामे झाली नाहीत, ती विरोधात असताना झाली, असे सांगत छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी शनिवारी भाजप प्रवेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. आमची फाईल कायम डस्टबीनमध्येच जायची, असे सांगत त्यांनी राष्ट्रवादीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. त्याचवेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामांचे तोंडभरून कौतुक केले. 

शिवाजी महाराजांचे विचार भाजपच पुढे नेत आहे, उदयनराजेंचा भाजपत प्रवेश

भाजप प्रवेशानंतर पत्रकारांशी संवाद साधताना उदयनराजे म्हणाले, १९९८ पासून माझी आणि देवेंद्र फडणवीस यांची मैत्री आहे. आमच्या मैत्रीत कधीच व्यत्यय आला नाही. भाजपमध्ये येण्याला घरवापसी म्हणता येणार नाही. आम्ही आधीही एक होतो आणि आजही एक आहोत. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात राज्यात विकासाची अनेक कामे मार्गी लागली आहेत. त्याचे काम वाखणण्यासारखेच आहे.

'उदयनराजेंवर पोटच्या मुलाप्रमाणे प्रेम करणाऱ्या पवारांना काय मिळाले?'

देवेंद्र फडणवीस यांनी विकास कामात कधीच राजकारण केले नाही. प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात कामे सुरू आहेत. आमचा पक्ष सत्तेत होता, त्यावेळी आमची फाईल डस्टबीनमध्ये जायची ही वस्तुस्थिती आहे. विरोधात असताना जी कामे झाली ती आमचा पक्ष सत्तेत असताना झाली नाहीत, असे उदयनराजे यांनी सांगितले. 

मतदारांचा विचार करूनच आम्ही हा निर्णय घेतला असल्याचे सांगून ते म्हणाले, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हवे तितके मताधिक्य आम्हाला मिळाले नाही. उमेदवारी द्यायची आणि त्याच्या विरोधात काम करायचे, हेच आमच्या पक्षात सुरू होते. आडवा आणि जिरवा हेच काम केले जात होते, अशीही टीका त्यांनी केली.