पुढच्या महिन्यात होत असलेली विधानसभेची निवडणूक लढवायची की नाही, या संदर्भात पक्षाच्या नेत्यांची मते जाणून घेण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला पक्षाचे राज्यातील महत्त्वाचे नेते उपस्थित होते. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी कृष्णकुंज येथे ही बैठक झाली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याची कोणतीही अधिकृत माहिती पक्षाकडून देण्यात आली नाही. पण काही वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, विधानसभेची निवडणूक लढविण्यावर पक्षाच्या सर्व नेत्यांमध्ये एकमत झाले नाही. आता राज ठाकरेच यासंदर्भात अंतिम निर्णय घेतील.
दिल्लीमध्ये ४ नोव्हेंबरपासून लागू होणार सम-विषम योजना: केजरीवाल
मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेने उमेदवार उभे न करण्याचा निर्णय घेतला होता. पण राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात १० ठिकाणी जाहीर सभा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली होती. राज ठाकरे यांनी त्यावेळी वेगवेगळे व्हिडिओ जाहीर सभांमधून दाखवून आपल्या सभांकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले होते. लाव रे तो व्हिडिओ हा हॅशटॅग त्यावेळी खूप चर्चेत आला होता.
सुप्रिया सुळेंशी गैरवर्तणूक करणाऱ्या टॅक्सी चालकाला अटक
लोकसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे यांनी ईव्हीएममध्ये फेरफार केला जाऊ शकतो. त्यामुळे ईव्हीएमचा वापर थांबविण्याचा मुद्दा आग्रहीपणे मांडायला सुरुवात केली. सर्वच विरोधी पक्षांना या मुद्द्यावर एकत्र आणून त्यांनी ईव्हीएम हटाव मोहिम सुरू केली. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्तांची त्यांनी भेटही घेतली होती. त्याचबरोबर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचीही त्यांनी या मुद्द्यावरून भेट घेतली होती. आता ईव्हीएमच्याच मुद्द्यावरून निवडणुकीत काय भूमिका घ्यायची, हे मनसेला निश्चित करावे लागणार आहे. सध्यातरी विधानसभेची निवडणूक ईव्हीएमच्या साह्यानेच होणार हे स्पष्ट आहे. त्यामुळेच राज ठाकरे निवडणूक लढविण्यासंदर्भात काय भूमिका घेतात, याकडे सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.