लोकशाहीच्या खुनाबद्दल बोलण्याचा काँग्रेसला अधिकार आहे का, असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी उपस्थित केला. देशात आणीबाणी कोणी आणली, लोकशाही पद्धतीने निवडून आणलेली सरकारे हुकूमशाही पद्धतीने कोणी पाडली, असे प्रश्न उपस्थित करीत देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केलेले सर्व मुद्दे खोडून काढले.
स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा: उध्दव ठाकरे
साताऱ्याचे माजी खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला. पक्ष प्रवेशापूर्वी त्यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. यानंतर यावर टीका करताना पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले होते की, तीन महिन्यात खासदाराला राजीनामा द्यायला लावणे हा तर लोकशाहीचा खून आहे. याच मुद्द्याला पकडून देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका केली. महाजनादेश यात्रेचे रविवारी सातारा जिल्ह्यात आगमन झाले. यानंतर सोमवारी सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले, उदयनराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. सातारा जिल्ह्यात विरोधकांचे अस्तित्त्व राहते की नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. आता उदयनराजे आणि भाजपवर होणाऱ्या टीकेला जनताच उत्तर देईल.
तुकड्यांवर जगणारी आमची औलाद नाहीः शिवेंद्रराजे
औद्योगिक गुंतवणुकीत महाराष्ट्र आठव्या क्रमांकावरून तेराव्या क्रमांकावर गेला आहे, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती. त्यालाही देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांत अभूतपूर्व गुंतवणूक झाली आहे. देशात आलेल्या गुंतवणुकीच्या ४९ टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली आहे. एवढेच नाही तर गुंतवणुकीमध्ये आपल्या नंतरच्या पाच राज्यांमधील एकत्रित गुंतवणूक आपल्यापेक्षा कमीच आहे, याकडेही देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष वेधले.
सांगली, कोल्हापूरमधील पूरस्थितीवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी विशेष आराखडा तयार केला जात आहे. पावसाच्या पाण्याचे नियोजन केले जाणार असून, जपानसारख्या शहरात पूरस्थिती कशा पद्धतीने हाताळली जाते, याचाही अभ्यास केला जाणार आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यासाठी २२ तज्ज्ञांच्या एका समितीने नुकतीच या भागाची पाहणी केली. यामध्ये जागतिक बँक आणि एशियन डेव्हलपमेंट बँकेचे अधिकारीही होते, असेही त्यांनी सांगितले.
उदयनराजे १९ सप्टेंबरला मोदींना भेटणार
कोणत्याही राजकीय पक्षप्रवेशाला पंतप्रधान उपस्थित राहात नाहीत, हा राजशिष्टाचार आहे. त्यामुळेच उदयनराजे यांच्या पक्षप्रवेशावेळी नरेंद्र मोदी उपस्थित राहिले नाहीत. पण त्यांनी निरोप पाठविला आहे. १९ तारखेला नाशिकमध्ये होणाऱ्या सभेनंतर नरेंद्र मोदी यांनी वेळ राखून ठेवला आहे. त्यावेळी उदयनराजे आणि मी पंतप्रधानांची भेट घेणार आहोत, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.