पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काम केल्यामुळंच भाजपला मतदान, ईव्हीएमवरुन उदयनराजेंचं घुमजाव

उदयनराजे भोसले

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रथमच जाहीर भाषण करणारे उदयनराजे भोसले यांनी तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली. आघाडी सरकारच्या कार्यकाळात घोंगडं भिजत ठेवण्याचेच काम झाले. त्यांच्या कार्यकाळात फक्त घोषणा झाल्या पण कार्यवाही काहीच झाली नाही. आघाडी सरकारने अनेक प्रकल्प रखडवल्याचा आरोप करत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव न घेता त्यांच्यावरही निष्क्रियतेचा आरोप केला. भाजपत प्रवेश करण्यापूर्वी ईव्हीएमवर आरोप करणाऱ्या उदयनराजेंनी मात्र यावेळी घुमजाव केले. त्यांनी भाजपचे कौतुक केले. भाजपने केलेल्या विकासकामांमुळेच त्यांना मते मिळत असल्याचे आपल्याला जाणवल्याचे त्यांनी म्हटले. यावेळी त्यांनी ट्रोल करणाऱ्यांना इशारा दिला. तुकडे काय असतात हे मी दाखवून देईन, अशी धमकीच त्यांनी व्यासपीठावरुन दिली. 

सातारा येथे महाजनादेश यात्रेच्या सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, शिवेंदसिंहराजे भोसले आदींसह भाजपचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते. 

आमची फाईल कायम डस्टबीनमध्येच जायची, उदयनराजेंची राष्ट्रवादीवर टीका

काय म्हटलं उदयनराजेंनी...


गेल्या ३० वर्षांपासून मी फक्त जनतेला केंद्रबिंदू मानले, अहोरात्र विकासकामांसाठी प्रयत्न केला. माझे कधीतरी ऐकतील असे मला वाटत होते. पण माझ्या फायली या डस्टबीनमध्येच जात. राष्ट्रवादी काँग्रेसने मला काही नाही तरी सहनशीलतेचा तरी पुरस्कार द्यायला हवा होता, असा टोलाही त्यांनी लगावला.

उमेदवार तर कंटाळले आहेत. आता लोकही कंटाळले आहेत. आत्मचिंतन केले असते तर आत्मक्लेष करावा लागला नसता, असे नाव न घेता त्यांनी पवार कुटुंबीयांवर निशाणा साधला.

साताऱ्याचे मुख्यमंत्री असताना जिल्ह्याची काही कामेच झाली नाहीत. सतत घोगंड भिजत ठेवायचे, लोकांनी १० खेट्या मारल्यानंतरही कामे होत नसत. सही करण्यासाठी त्यांच्या पेनमधील शाई संपली असेल म्हणून त्यांना नवीन पेनही भेट दिला. पण त्याचाही उपयोग झाला नाही. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र हजारो कोटींची कामे केली. विरोधी पक्षात असतानाही त्यांनी आम्हाला मदत केली. माझा बँड कोणी वाजवू शकणार नाही. माझा बँड मीच वाजवू शकतो. मी बँड मास्तर आहे, असे ते म्हणाले. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:assembly election 2019 maha janadesh yatra udayanraje bhosale slams on ncp and congress in the presence of cm devendra fadnavis