पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

BLOG : पुण्याचा कॉस्मोपॉलिटिकल चेहरा, पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघ

पुणे कॅन्टोन्मेंट

पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघ पूर्वी खुल्या गटात होता. १९९५ सालचा अपवाद वगळता काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. २००९ पासून अनुसूचित जातींसाठी हा मतदारसंघ आरक्षित झाला. काँग्रेसचे रमेश बागवे तिथून आमदार म्हणून निवडून आले आणि अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात राज्यमंत्री देखील झाले. परंतु, २०१४ च्या निवडणुकीत सगळीच समीकरणे बदलली. सर्वच पक्ष वेगळे लढल्यामुळे प्रमुख ५ उमेदवारांत निवडणूक झाली. माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे चुरशीच्या लढतीत सुमारे १२ हजार मतांनी निवडून आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पहिल्याच मंत्रिमंडळात राज्यमंत्री देखील झाले.

पुणे शहरातील काही जुन्या पेठा, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड, वानवडी, सेव्हन लव्हज चौक, कोरेगाव पार्कसारखा उच्चभ्रू भाग, ताडीवाला रोड, जुना बाजार आणि घोरपडी अशा झोपडपट्यांचाही समावेश या मतदारसंघात होतो. अनुसूचित जातींमध्ये हिंदू धर्मातील आणि नवबौद्ध अशा दोन प्रकारात विभागणी होते. हिंदू धर्मातील अनुसूचित जातींमध्ये प्रामुख्याने मातंग, चर्मकार समाज मतदारसंघात जास्त आहे. मुस्लिम, शीख आणि ख्रिश्चन धर्मियांची संख्यादेखील लक्षणीय आहे. तेलगू भाषिक लोक बी टी कवडे रस्त्याच्या भागात जास्त आहेत. कानडी भाषिक लोक देखील लक्षणीय आहेत. मिश्र समाज असलेला हा मतदारसंघ आहे. कुठल्याही विशिष्ठ जातीचा प्रभाव नसणारा हा पुण्यातील एकमेव मतदारसंघ आहे.

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डच्या अंतर्गत येणाऱ्या भागात मोठ्या प्रमाणात समस्या आहेत. कालबाह्य झालेले कायदे, बोर्डचे स्वतःचे मर्यादित उत्पन्न आणि जीएसटीमुळे घटलेले उत्पन्न अशा अनेक समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत. शिवाजी मार्केट परिसरातील वाहतूक, कोरेगाव पार्क भागातील हॉटेलमुळे होणारी वाहतूक समस्या, जुन्या पेठांमधील अरुंद रस्ते, घोरपडी भागातील उड्डाणपूल, पुणे रेल्वे स्टेशन भागातील समस्या आणि बंडगार्डन भागातील पाणी समस्या अशा अनेक समस्या नागरिकांना भेडसावत आहेत.

सध्याचे आमदार आणि माजी मंत्री दिलीप कांबळे यांनी काही समस्या सोडवण्यावर भर दिला आहे. घोरपडी भागातील उड्डाणपूलाचे भूमिपूजन झाले आहे (दिवंगत मनोहर पर्रिकर यांनी लवकर परवानगी मिळवून दिल्यामुळे उड्डाणपूलाचे काम मार्गी लागले). बंडगार्डन भागातून मेट्रो जात असल्यामुळे वाहतुकीची समस्या कमी होण्यास मदत होईल. जुन्या वाड्यांच्या पुनर्बांधणीसाठी नियमावली करण्यात येत आहे. जुन्या पेठांमध्ये मालक आणि भाडेकरू यांचा प्रश्न सुटायला मदत होऊ शकेल. दिलीप कांबळे यांच्यावर झालेला आरोप आणि एफआयआर यांच्यामुळे त्यांचे मंत्रिपद गेले. कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल नाराजी आहे. पक्षाने देखील त्यांना मंत्रिमंडळातून वगळून एक प्रकारे इशाराच दिला आहे.

पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघामध्ये कमी मतदानाची परंपरा आहे. मागील लोकसभा आणि आताच्या लोकसभेला भाजपला आघाडी मिळाली पण थोड्याच मतांची. विधानसभा असो अथवा लोकसभा ४६ ते ४८ टक्क्यांच्या मध्येच मतदान होते. जो कोणी जिंकून येईल तो ९ ते १२ हजारांच्या फरकानेच जिंकतो. अनिल शिरोळे यांना सुमारे १४ हजार मतांची आघाडी मिळाली होती. २०१४ च्या निवडणुकीत दिलीप कांबळे १०९४६ मतांनी निवडून आले होते, तर गिरीश बापट यांना सुमारे १२ हजाराचे मताधिक्य मिळाले होते. बाळासाहेब शिवरकर, रमेश बागवे आणि दिलीप कांबळे असे ३ मंत्री या मतदारसंघाने दिले पण कोणीच आपला कार्यकाळ पूर्ण करू शकला नाही, हे विशेष.

- महेश साने
maheshsane15@gmail.com