पुढील बातमी

राज्यपालांच्या निर्णयानंतर पुढची भूमिकाः थोरात

राज्यपालांच्या निर्णयानंतर पुढची भूमिकाः थोरात

राज्यामध्ये सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. शिवसेना आणि भाजपमध्ये सत्ता स्थापनेवरुन वाद सुरुच आहे. तेराव्या विधानसभेचा कार्यकाळ शनिवारी, ९ नोव्हेंबर रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. सत्ता स्थापनेबाबत आता शिवसेना आणि भाजप नेमका काय निर्णय घेणार आहे याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. 

Fri, 08 Nov 2019 09:58 PM IST

राज्यपालांच्या निर्णयानंतर पुढची भूमिकाः बाळासाहेब थोरात

राज्यपाल आता काय निर्णय घेतात, याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत. राज्यपालांच्या निर्णयानंतरच आम्ही भूमिका घेऊ, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली. सत्ता स्थापनेवरुन सुरु असलेल्या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी माध्यमांशी संपर्क साधला.

यावेळी माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि माणिकराव ठाकरे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार स्थापन्याचे निमंत्रण स्वीकारण्यासाठी राज्यपालांना भेटायला गेलेत असे आम्हाला वाटले होते. महायुतीला जनादेशही होता. पण फडणवीस यांनी राजीनामा दिला, असा टोला त्यांनी लगावला

Fri, 08 Nov 2019 08:44 PM IST

भाजपने सरकार बनवू शकत नसल्याची कबुली दिली- पृथ्वीराज चव्हाण

राजीनामा देऊन देवेंद्र फडणवीस यांनी सरकार बनवू शकत नसल्याची कबुली दिली आहे. गेल्या पाच वर्षांतील नाकर्तेपणा, निष्क्रियतेमुळे जनतेने त्यांना नाकारले असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

Fri, 08 Nov 2019 07:37 PM IST

उद्धव ठाकरे यांनी केलेले सर्व आरोप भाजपने फेटाळले

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केलेले सर्व आरोप भाजपने फेटाळले आहेत. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ज्या ज्या नेत्यांचा दाखला उद्धव ठाकरे यांनी दिला. ते सर्व भाजपच्या विरोधात असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. सत्तेत असताना त्यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली नव्हती. पण शिवसेनेने सत्तेत राहून आमच्या नेत्यांवर टीका केली, याकडे सुधीर मुनगंटीवार यांनी लक्ष वेधले. 

Fri, 08 Nov 2019 06:41 PM IST

'मला खोटं ठरवणार असाल तर मला कोणतेही संबंध ठेवायचे नाहीत'

मला जर कोणी खोटं ठरवणार असेल तर मला त्यांच्याशी कोणतेही संबंध ठेवायचे नाहीत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. 

Fri, 08 Nov 2019 06:36 PM IST

कर्जमाफी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही - उद्धव ठाकरे

अजूनही कर्जमाफी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही, याबद्दल मला दुःख वाटते, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. 

Fri, 08 Nov 2019 06:30 PM IST

चुकीच्या माणसांसोबत गेलो याचे दुःख - उद्धव ठाकरे

गंगा साफ करता करता मनं कलुषित झाली, याचे मला दुःख झाले. चुकीच्या माणसांसोबत आपण गेलो होतो, याबद्दल मला खेद वाटतो, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. 

Fri, 08 Nov 2019 06:26 PM IST

आम्ही मोदींवर टीका केली नाही कारण मोदींनी मला लहान भाऊ म्हटले होते - उद्धव ठाकरे

आम्ही मोदींवर टीका केली नाही कारण मोदींनी मला लहान भाऊ म्हटले होते, असे उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Fri, 08 Nov 2019 06:23 PM IST

मी खोटं बोलणार नाही कारण मी काही भाजपवाला नाही - उद्धव ठाकरे

मी खोटं बोलणार नाही कारण मी काही भाजपवाला नाही, मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

Fri, 08 Nov 2019 06:20 PM IST

आम्हाला पहिल्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती पण आम्ही ती नाकारली होती - उद्धव ठाकरे

आम्हाला पहिल्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती पण आम्ही ती नाकारली होती - उद्धव ठाकरे

Fri, 08 Nov 2019 06:17 PM IST

शिवसेनाप्रमुखांच्या मुलावर पहिल्यांदा खोटारडेपणाचा आरोप - उद्धव ठाकरे

अमित शहा आणि कंपनीने कितीही आमच्यावर आरोप केले असले तरी कोण खोटे बोलते हे जनतेला चांगले माहिती आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले 

Fri, 08 Nov 2019 05:21 PM IST

अडीच वर्षाच्या मुद्द्यावर चर्चा झाली होती - राऊत

परंपरेनुसार मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागतो. इतर राज्यात टीकाकारांसोबत भाजप सत्तेत आहे. अडीच वर्षाच्या मुद्द्यावर चर्चा झाली होती, असे संजय राऊत यांनी सांगितले.  

Fri, 08 Nov 2019 05:20 PM IST

काळजीवाहू सरकारची आम्हाला काळजी वाटते - संजय राऊत

काळजीवाहू सरकारची आम्हाला काळजी वाटते. फडणवीसांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंच बोलतील, असे संजय राऊत यांनी सांगितले. 

Fri, 08 Nov 2019 05:02 PM IST

भाजप फोडाफोडीचे राजकारण करणार नाही - फडणवीस

मोदींविरोधात केलेले अपशब्द जिव्हारी लागले. भाजप फोडाफोडीचे राजकारण करणार नाही. येत्या काळात जे सरकार येईल ते भाजपच्या नेतृत्वाखाली असेल. भाजपच सरकार तयार करेल असा विश्वास आहे, असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले. 

 

Fri, 08 Nov 2019 05:01 PM IST

काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार - फडणवीस

काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार आहे. वैकल्पिक व्यवस्था होईपर्यंत काम पाहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 
 

Fri, 08 Nov 2019 04:55 PM IST

आम्ही आमची मर्यादा कधीच ओलांडली नाही - फडणवीस

दरी वाढवण्याचे काम सातत्याने केले गेले. अशा वक्तव्यातून सरकार तयार होत नसते. आम्ही आमची मर्यादा कधीच ओलांडली नाही. ज्या भाषेत बोलेले जातेय त्या भाषेत उत्तर देता येतात. शिवसेनेकडून मोदींवर वारंवार टीका केली गेली. मात्र बाळासाहेबांविरोधात आम्ही एकही वक्तव्य केले नाही, असे फडणवीस यांनी सांगितले. 

Fri, 08 Nov 2019 04:53 PM IST

शिवसेनेकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही - फडणवीस

अडीच वर्षाबाबत वरिष्ठांनी कुठलाच पर्याय दिला नाही. समज गैरसमज चर्चेतून सुटतात. आम्ही सातत्याने चर्चा केली. भाजपसोबत चर्चा करायची नाही. फक्त काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत चर्चा करायची हे धोरण शिवसेनेने स्विकारले. शिवसेनेकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. उध्दव ठाकरे यांनी एकही फोन केला नाही, असे फडणवीस यांनी सांगितले. 

Fri, 08 Nov 2019 04:49 PM IST

शिवसेनेची भूमिका धक्कादायक - फडणवीस

शिवसेनेच्या भूमिकेवर मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आमचे सर्व पर्याय खुले आहेत हे शिवसेनेने म्हटले होते. पर्याय खुले असल्याच्या शिवसेनेची भूमिका धक्कादायक आहे. अशी भूमिका मांडण्याचे कारण समजू शकले नाही. माझ्या समोर कधीही अडीच वर्षाच्या विषयावर निर्णय झाला नव्हता, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

Fri, 08 Nov 2019 04:43 PM IST

आमच्या सोबत आलेल्या शिवसेनेचेही आभार - फडणवीस

आमच्या सोबत आलेल्या शिवसेनेचेही आभार. ते सोबत होते की नाही हे तुम्हाला माहिती असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. 
 

Fri, 08 Nov 2019 04:40 PM IST

मुख्यमंत्र्यांनी जनतेचे मानले आभार

राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांचे आणि जनतेचे आभार मानले. पाच वर्षे जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली.

Fri, 08 Nov 2019 04:32 PM IST

मुख्यमंत्री सह्याद्री अतिथीगृहाकडे रवाना

राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह्याद्री अतिथीगृहाकडे रवाना झाले आहेत. भाजपचे सर्व नेते देखील सह्याद्री अतिथीगृहाकडे रवाना झाले आहेत. 

Fri, 08 Nov 2019 04:32 PM IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला राजीनामा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला आहे. राज्यपालांकडे त्यांनी राजीनामा दिला. कार्यकाळ संपण्याच्या एक दिवस आधी राजीनामा दिला. 

Fri, 08 Nov 2019 04:10 PM IST

१५ तारखेपर्यंत शिवसेना आमदारांना संरक्षण द्या - मिलिंद नार्वेकर

शिवसेना नेते मिलिंद नार्वेकरांनी मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र पाठवले आहे. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी १५ तारखेपर्यंत शिवसेना आमदारांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे. 
 

Fri, 08 Nov 2019 04:07 PM IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजभवनावर दाखल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजभवनावर दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणअयार आहे. थोड्याच वेळात त्यांची पत्रकार परिषद होणार आहे. 

Fri, 08 Nov 2019 03:29 PM IST

दुपारी साडेचार वाजता मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद

दुपारी साडेचार वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पत्रकार परिषद घेणार आहेत. 

Fri, 08 Nov 2019 03:28 PM IST

आशिष शेलार राजभवनात दाखल

राज्यपालांच्या भेटीसाठी भाजपचे आमदार आशिष शेलार राजभवनात दाखल झाले आहेत. 

Fri, 08 Nov 2019 03:27 PM IST

उद्धव ठाकरे हॉटेल रंगशारदामध्ये जाणार

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रंगशारदा हॉटेलमध्ये शिवसेनेच्या सर्व आमदारांची भेट घेणार आहेत.  

Fri, 08 Nov 2019 03:15 PM IST

रिपाइं प्रमुख तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले शरद पवारांच्या भेटीला

रिपाइं प्रमुख तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली.

Fri, 08 Nov 2019 02:18 PM IST

काँग्रेस, राष्ट्रवादीने ४८ तासात पुरावे द्यावे - सुधीर मुनगंटीवार

आमदारांच्या खरेदी-विक्रीचे आरोप खोटे आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी जनतेची माफी मागावी. कोणताही पुरावा नसताना अशी भाषा वापरणे हा लोकशाहीचा अवमान आहे. तसंच भाजप कोणत्याही पक्षाच्या आमदारांच्या संपर्कात नाही. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीने ४८ तासात पुरावे द्यावे नाही तर महाराष्ट्रातील जनेतेची माफी मागावी, अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. 

Fri, 08 Nov 2019 02:08 PM IST

शेतकरी संकटात आहे त्यांना मदत करा - उद्धव ठाकरे

शिवसेना भवनावर सुरु असलेली बैठक संपली आहे. प्रत्येक तालुक्यात मदतकेंद्र उभं करा. शेतकरी संकटात आहे. त्यांना तातडीची मदत करा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी या बैठकीवेळी दिले आहेत. 

Fri, 08 Nov 2019 01:48 PM IST

गडकरींच्या निवासस्थानी होणार बैठक

राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुंबईत आले आहेत. नितीन गडकरी वरळीतील निवासस्थानी पोहचले आहेत. गडकरींच्या निवासस्थानी बावनकुळे, तावडे, निलंगेकर उपस्थित आहेत. गडकरींच्या निवासस्थानी बैठक होण्याची शक्यता आहे. 

Fri, 08 Nov 2019 01:28 PM IST

शिवसेनेच्या महत्वपूर्ण बैठकीला सुरुवात

शिवसेना आमदार आणि खासदारांची देखील शिवसेना भवनात बैठक सुरु आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीला सुरुवात झाली आहे. 

Fri, 08 Nov 2019 12:53 PM IST

उद्धव ठाकरे शिवसेना भवनात दाखल

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सर्व जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावली आहे. दादर येथील शिवसेना भवनात ही बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीसाठी उद्धव ठाकरे शिवसेना भवनात दाखल झाले आहेत. ओला दुष्काळ आणि सध्याची राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आहे.  या बैठकीमध्ये उध्दव ठाकरे काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Fri, 08 Nov 2019 12:16 PM IST

संभाजी भिडे वर्षा बंगल्यावर दाखल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी संभाजी भिडे वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. 

Fri, 08 Nov 2019 11:55 AM IST

आम्ही आमच्या आमदारांना कुठेही हलवले नाही - विजय वडेट्टीवार

आम्ही आमच्या आमदारांना कुठेही हलवले नाही. आमचे सर्व आमदार त्यांच्या ठिकाणी आहेत. आमचे काही आमदार दुसऱ्या ठिकाणी गेले असतील तर ते कदाचित वैयक्तिक भेट असेल, असे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवर यांनी सांगितले आहे.

Fri, 08 Nov 2019 11:52 AM IST

मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपने लेखी पत्र घेऊन यावं - संजय राऊत

राज्यामध्ये सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटला नाही. शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपने लेखी पत्र घेऊन यावं, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले आहे. तसंच, भाजपकडे बहुमत असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री बनायला हरकत नाही, असे देखील त्यांनी सांगितले. 

  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:राज्यपालांच्या निर्णयानंतर पुढची भूमिकाः थोरात